फसवणुकीपासून जागे करावे
By admin | Published: March 23, 2016 12:54 AM2016-03-23T00:54:51+5:302016-03-23T00:54:51+5:30
समृद्ध जीवन, शारदा चिटफंडसारख्या संस्थांनी आर्थिक घोटाळे करून देशातील लाखो लोकांची फसवणूउक केली. आर्थिक अज्ञान आणि जास्त पैसा मिळतो या हव्यासापोटी लोक अशा संस्थांमध्ये गुंतवणूक करतात
पिंपरी : समृद्ध जीवन, शारदा चिटफंडसारख्या संस्थांनी आर्थिक घोटाळे करून देशातील लाखो लोकांची फसवणूउक केली. आर्थिक अज्ञान आणि जास्त पैसा मिळतो या हव्यासापोटी लोक अशा संस्थांमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे सनदी लेखापालांनी समाजातील
अशा अज्ञानी लोकांना माहिती देऊन त्यांची फसवणूक टाळावी, असे मत खासदार अमर साबळे यांनी केले.
सनदी लेखापाल संघटनेच्या पश्चिम विभागाच्या वतीने आयोजित पदवीदान समारंभात खासदार साबळे बोलत होते. या वेळी सीएची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या २६ विद्यार्थ्यांना खासदार साबळे यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
या वेळी सनदी लेखापाल संघटनेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष सुहास गार्डी, केंद्रीय सदस्य शिवाजी झावरे, शिल्पा सिनगारे, प्राजक्ता चिंचोलकर उपस्थित होते.
साबळे म्हणाले, ‘‘सीएंनी देशासाठी काम केले पाहिजे. सीए जोपर्यंत समाजात जात नाही तोपर्यंत त्यांच्या ज्ञानाचा फायदा होणार नाही. म्हणून आपल्या ज्ञानाचा फायदा समाजातील अज्ञानी लोकांसाठी झाला पाहिजे. तसेच गैरव्यवस्थापन करणाऱ्या संस्थांची माहिती घेऊन त्या संदर्भात लोकांना माहिती दिली पाहिजे.’’
झावरे म्हणाले, ‘‘इतर देशांच्या तुलनेत भारतात सीएंची संख्या अतिशय कमी आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सीएंनी आधुनिक बनावे.’’ (प्रतिनिधी)