बांधकाम प्रकल्पाचे काम सुरु असताना भिंत कोसळली; तरुणाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 01:10 PM2021-11-14T13:10:04+5:302021-11-14T13:10:10+5:30
बांधकामाच्या पायासाठी खड्डा खोदण्यात आला असून त्या खड्ड्यात ही संरक्षण भिंत उभारण्यात आली
पिंपरी : बांधकाम प्रकल्पाच्या पायाच्या खड्ड्याची संरक्षण भिंत कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला. तसेच एक मजूर गंभीर जखमी झाला. मावळ तालुक्यातील गहुंजे गावाजवळ कन्स्ट्रक्शन साईटवर शक्रवारी (दि. १२) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
व्यंकटेश पांडुरंग जाधव (वय १९, रा. कात्रज), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. एम. डी. अफजली (वय २१), असे गंभीर जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यंकटेश जाधव हा सर्व्हेअरचा मदतनीस म्हणून काम करीत होता. गहुंजे गावाच्या जवळ बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. बांधकामाच्या पायासाठी खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यात संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. या खड्ड्यात शुक्रवारी फुटींगचे काम सुरू असताना भिंत कोसळली. यात व्यंकटेश जाधव व एम. डी. अफजली हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान व्यंकटेश जाधव याचा मृत्यू झाला. रुग्णालयाकडून याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.