रावेत येथील उद्यान नको स्मशान भूमीच हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 06:22 PM2020-01-04T18:22:36+5:302020-01-04T18:32:25+5:30
रावेत येथील स्मशानभूमीवरून संघर्ष पेटणार
पिंपरी : नागरिकांच्या विरोधामुळे प्राधिकरण हद्दीतील रावेत येथील स्मशानभूमी रद्द करून उद्यान विकासित करण्याचा निर्णय नगरसेवक, नागरिक आणि प्रशासन यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यास वाल्हेकरवाडीतील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. मूठभर लोकांसाठी स्मशानभूमीच्या सुविधेपासून वंचित ठेवणे योग्य नाही, उद्यान नको स्मशान भूमीच हवी अशी भूमिका घेतली आहे. ग्रामस्थांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. ह्यपुन्हा बैठक घेऊन नागरी हिताच्या दृष्टीन निर्णय घेऊ, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या वतीने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात रावेत येथील सेक्टर ३२ मध्ये स्मशानभूमीचे आरक्षण होते. हे आरक्षण विकसित करण्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले होते. सध्या साठ टक्के काम पूर्ण झाले आहे. रावेत येथील स्मशानभूमी होऊ नये, यासाठी प्रभाग क्रमांक सोळा मधील नागरिकांनी विरोध केला होता. तसेच आंदोलनेही केली. स्मशानभूमी झाल्यास वाऱ्याच्या दिशेनुसार स्मशानभुमीतून निघणारा धूर थेट या नागरिकांच्या घराकडे येईल. आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी विरोध केला होता.
नगरसेवकांची गोची
महापालिकेतील चौथ्या मजल्यावरील आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात ३० डिसेंबरला प्रभाग क्रमांक सोळा आणि सतरा मधील सर्वपक्षीय नगरसेवकांसोबत बैठक झाली. त्या बैठकीत नागरिक, नगरसेवक आणि प्रशासन अशी बैठक झाली. त्यात स्मशानभूमी ऐवजी उद्यान विकसित करा, असे सवार्नुमते ठरल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काम थांबविण्याचे आदेश दिले होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, रावेत, गुरूद्वारा परिसरातील नागरिकांनी बैठक घेऊन स्मशाभूमीच व्हायला हवी, यासाठी ग्रामस्थांची बैठक झाली. त्यात आरक्षण बदलास विरोध दर्शविला आहे. यावेळी आरक्षण बदलाचा निर्णय घेण्यावेळी उपस्थित असणाºया नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे नगरसेवकांची गोची झाली आहे.
आयुक्तांनी दिले आश्वासन
नागरीकरण वाढीच्या दृष्टीने रावेत येथील स्मशानभूमीचे आरक्षण विकसित होणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी स्मशानभूमीच करावी, अशी मागणी करण्यासाठी वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिकांनी आज आयुक्तांची भेट घेतली. या वेळी दोन्ही प्रभागातील नगरसेवक आणि पदाधिकारीही उपस्थित होते. त्यावर आयुक्तांनी पुन्हा एकदा या विषयावर चर्चा करू, असे आश्वासन दिले.
-------------
रावेत येथील स्मशानभूमी करू नये, अशी या भागातील काही सोसायट्यांनी मागणी केली होती. याबाबत नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक अशी बैठकही झाली. सर्वांनी स्मशानभूमी नको, यास संमती दिली. तसेच साठ टक्के काम झाल्याने या जागेचा, इमारतीचा वापर बदलायचा झाल्याच महापालिकेचे काही नुकसान होणार नाही ना? याबाबतची माहितीही घेतली. त्यावेळी सध्याच्या कामाचे स्ट्रक्चर हे उद्यानात बदलता येऊ शकते, अशी माहिती मिळाली. त्यामुळे नागरिकांचा विरोध आणि लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेता कामास तात्पुरती स्थगिती दिली होती. स्थगिती देताना स्मशानभूमीला पर्यायी जागा शोधता येईल का? याबाबतही प्रशासनास सूचना केल्या होत्या. आता स्मशानभूमीच हवी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांची आहे. स्मशानभूमी रद्द करण्याला विरोध नोंदविला आहे. त्यामुळे या प्रश्नांवर पुन्हा बैठक घेतली जाईल. त्यानंतर सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ. लोकहितासाठी निर्णयाचा फेरविचार होऊ शकतो.
- श्रावण हर्डीकर,आयुक्त