‘ओव्हर टाईम' चा पगार हवाय; सहीसाठी १० हजार दे..! प्रशासन अधिकाऱ्यांची लिपिकाकडे लाचेची मागणी
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: April 1, 2024 09:32 AM2024-04-01T09:32:04+5:302024-04-01T09:32:25+5:30
''ओव्हर टाईमचे प्रलंबित बिल काढण्यासाठी वरिष्ठ अधिकारी हे कर्मचाऱ्यांना वेठीस धरुन सही साठी पैसे मागत असेल, तर हे शंभर टक्के चुकीचे''
पिंपरी : लिपिक, मुख्य लिपिकांचे सहा महिन्याचे प्रलंबित 'ओव्हर टाईम' चे पगार बिल काढायचे आहे, तर मला फाईलवर सही करायला दहा हजार रुपये द्यावे लागेल. त्याशिवाय फाईलवर सही करणार नाही, अशी अजब मागणी महापालिकेतील कर आकारणी व कर संकलनचे प्रशासन अधिकाऱ्यांने केली आहे. याबाबत महापालिकेच्या सहायक आयुक्तांने समाज माध्यमातून पोस्ट व्हायरल करत संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांचे बिंग फोडले आहे. यावर महापालिका आयुक्त शेखर सिंह हे संबंधित अधिका-यांवर काय कारवाई, याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागातील लिपिक आणि मुख्य लिपिक हे एक हजार कोटीचे उदिष्ट पुर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. सकाळी लवकर कार्यालयात येऊन रात्री उशिरापर्यंत काम करत आहेत. महापालिकेच्या लिपिक आणि मुख्य लिपिकांना चोवीस तास अतिकालीन भत्ता देण्याची तरतूद आहे. मात्र, कर संकलनच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मार्च २०२४ या तीन महिन्यासाठी ४८ तासाचा ओव्हर टाईम देण्याचा निर्णय करसंकलन विभागाने घेतला होता. त्यामुळे थेरगांव करसंकलन कार्यालयातील लिपिक कर्मचाऱ्यांनी एप्रिल २०२३ ते ऑगस्ट २०२३ पर्यंत अतिकालीन भत्ता गट लिपिकांनी काढला. त्यानंतर सदरची फाईल ही सही करण्यासाठी करसंकलन विभागाचे प्रशासन अधिकारी राजाराम सरगर यांच्याकडे पाठवण्यात आली.
संदेश व्हायरल....
ओव्हर टाईम फाईलवर सही करण्यास प्रशासन अधिकारी सरगर यांनी नकार दिला. त्यावर संबंधित लिपिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फाईलवर सही नसल्याचे कारण विचारले. त्यावर त्यांनी फाईलवर सहीसाठी दहा हजार रुपये द्यावे लागेल, तुम्ही दहा हजार रुपये देणार असाल तरच फाईलवर सही करणार अथवा सही करणार नाही, असा संदेश सहायक आयुक्त श्रीकांत कोळप यांनी समाज माध्यमातून व्हायरल केला आहे.
ओव्हर टाईमचे प्रलंबित बिल काढण्यासाठी वरिष्ठ अधिकारी हे कर्मचाऱ्यांना वेठीस धरुन सही साठी पैसे मागत असेल, तर हे शंभर टक्के चुकीचे आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी महासंघाकडे त्या वरिष्ठांची तक्रार करावी, याबाबत प्रशासन अधिकारी राजाराम सरगर यांनी पैशाची मागणी केली असेल, तर त्यांच्यावर कारवाई झालीय पाहिजे. याकरिता महासंघाकडून आयुक्तांना भेटून कडक कारवाई करावी, म्हणून लेखी पत्र देण्यात येईल. - बबन झिंजुर्डे, अध्यक्ष, कर्मचारी महासंघ, पिंपरी चिंचवड महापालिका.