साहेब, होर्डिंग्जवर कारवाई करायची आहे, मार्गदर्शन करा!
By नारायण बडगुजर | Published: May 17, 2024 09:06 AM2024-05-17T09:06:51+5:302024-05-17T09:07:07+5:30
कार्यादेशाबाबत ‘पीएमआरडीए’ कडून नगर सचिवांकडे पत्रव्यवहार
नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी (जि. पुणे) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत पुणे जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंग्ज, जाहिरात फलक, आकाशचिन्ह, बॅनर, फ्लेक्स हटविण्याबाबत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निविदा खुली करता आली नाही. आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत ती खुली करून अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्यासाठी कार्यादेश देता यावा, यासाठी ‘पीएमआरडीए’ने नगरविकास सचिवांशी पत्रव्यवहार केला आहे.
गेल्यावर्षी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत किवळे येथे होर्डिंगचा सांगाडा कोसळून पाच जणांना जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून ‘पीएमआरडीए’ हद्दीतील धोकादायक होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर ‘पीएमआरडीए’ने आकाशचिन्ह परवाना कक्ष कार्यान्वित केला. या कक्षाने मार्चमध्ये १,०५७ होर्डिंग्जचे सर्वेक्षण केले. त्या सर्व हाेर्डिंग्जवाल्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यापैकी ४७२ जणांना कारवाईबाबत अंतिम नोटीस दिली आहे.
३ वेळा राबविली निविदा प्रक्रिया
- अनधिकृत होर्डिंग्ज,फ्लेक्स हटविण्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात येणार आहे.
- त्यानुसार निविदा मागवण्यात आल्या. दोनदा निविदा प्रसिद्ध केली. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने तिसऱ्यांदा निविदा मागवल्या.
- त्यानंतर तीन निविदाधारक पात्र झाले. मात्र, आचारसंहिता लागू झाल्याने निविदा खुल्या करता आल्या नाहीत.