रहाटणी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य
By admin | Published: May 10, 2017 04:10 AM2017-05-10T04:10:51+5:302017-05-10T04:10:51+5:30
पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून पालिका प्रशासन वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र आपले शहर खरेच
लोकमत न्यूज नेटवर्क
रहाटणी : पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून पालिका प्रशासन वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र आपले शहर खरेच स्वच्छ व सुंदर आहे का, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. कारण रहाटणी परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. काही ठिकाणी कचराकुंडी नसल्याने नागरिक मोकळ्या जागेत कचरा टाकीत आहेत. अनेक वेळा हा कचरा वाऱ्यामुळे रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक २७ रहाटणी येथील रहाटणी चौक, नखाते वस्ती चौक, रहाटणी फाटा, गोडांबे कॉर्नरसह अनेक ठिकाणी परिसरात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. पूर्वी या ठिकाणी कचराकुंड्या होत्या. मात्र घरोघरी कचरा उचलण्यासाठी गाड्या जात असल्याचे कारण पुढे करीत परिसरातील कचराकुंड्या काढून टाकण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी कचराकुंड्या होत्या, त्या ठिकाणी ‘कचरा टाकू नये’असे फलक लावले आहेत. तरीही नागरिक या ठिकाणी कचरा टाकीत आहेत. नागरिकांच्या मते कचरा उचलणाऱ्या गाड्या दोन-दोन दिवस येत नसल्याने नागरिकांची फसगत होत आहे. घरात कचरा किती दिवस ठेवायचा, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. त्यामुळे नागरिक नाईलाजाने पूर्वी कचराकुंड्या होत्या, त्या ठिकाणी सर्रास कचरा टाकीत आहेत. हा कचरा एवढ्या प्रमाणात साचत आहे की, काही वेळा हा कचरा आहे त्याच ठिकाणी कुजत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे परिसरात डासांच्या प्रमाणात वाढ होत असून, त्यामुळे साथीच्या आजाराला प्रोत्साहन मिळत आहे.
सध्या परिसरात साथीच्या विविध आजारांनी नागरिक हैराण आहेत. पालिका रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांच्या रांगा दिसून येत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने परिसरातील ठिकठिकाणी साचलेला कचरा रोजच्या रोज वेळेवर उचलण्याची मागणी होत आहे.