महामार्गाचे झालेय विद्रूपीकरण
By admin | Published: May 1, 2017 02:37 AM2017-05-01T02:37:20+5:302017-05-01T02:37:20+5:30
मावळ परिसरात जुना मुंबई-पुणे महामार्गावरील ओढ्यांच्या पुलांना मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा विळखा बसल्याने
शिरगाव : मावळ परिसरात जुना मुंबई-पुणे महामार्गावरील ओढ्यांच्या पुलांना मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा विळखा बसल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या कचऱ्याच्या तीव्र दुर्गंधीमुळे वाहनचालक, प्रवासी व पादचारी त्रस्त आहेत. कचऱ्यामुळे महामार्गाचे विद्रूपीकरण झाले आहे.
सोमाटणे टोलनाक्याजवळील महामार्गालगतच्या ओढ्यावरील पुलालगत मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक, थर्माकोल, हॉटेलमधील दूषित अन्न व कचरा, सडलेल्या भाज्या, मैला, रासायनिक, तसेच घरातील कचरा व मटणाच्या दुकानातील खराब मटणाचे पीस, सडलेली अंडी, कोंबडीचे पंख आदी पदार्थ टाकले जातात. सदर कचरा कुजल्याने तीव्र दुर्गंधीयुक्त वास येत आहे. पावसाळ्यात ओढ्याला पाणी आल्यावर कचरा पाण्याबरोबर नदीत वाहून जातो. नदीचे पाणीही दूषित होते. या साचलेल्या कचऱ्याच्या ढिगावर कुत्री, डुक्कर, कावळे, जनावरे गर्दी करतात. यातून मिळेल ते पदार्थ तोंडात घेऊन पळ काढताना प्राणी महामार्गावरील वाहनांना धडक देतात. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. (वार्ताहर)
देखभालीकडे दुर्लक्ष : उपाययोजनांची गरज
वाऱ्यामुळे या कचऱ्याच्या ढिगातील प्लॅस्टिकच्या पिशव्या महामार्गावर, तसेच महामार्गालगत ठिकठिकाणी साचल्याने महामार्गाचे विद्रूपीकरण झाले आहे. असे चित्र मावळ तालुक्यातील देहूरोड ते लोणावळापर्यंतच्या महामार्गालगत दिसून येत आहे. या महामार्गावर आरबीआयकडून टोल वसूल केला जात आहे. परंतु सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
महामार्गालगत अशा ठिकाणी साचलेला कचरा तत्काळ उचलून या ठिकाणी कचरा टाकण्यावर निर्बंध घालावेत व पादचारी, वाहनचालक यांच्या आरोग्याशी असलेला प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी ठोस उपाययोजना करून महामार्ग सुशोभीत करावा, अशी मागणी रहिवासी, पादचारी व वाहनचालक यांच्याकडून होत आहे.