स्ट्रॉम वॉटर चेंबरचा वापर कचऱ्यासाठी
By admin | Published: December 22, 2015 01:10 AM2015-12-22T01:10:30+5:302015-12-22T01:10:30+5:30
रस्त्यावर साचणारे पावसाचे पाणी योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी महापालिकेने शहरातील अनेक रस्त्यांवर जमिनीखालून स्ट्रॉम वॉटर लाइन टाकली आहे
रहाटणी : रस्त्यावर साचणारे पावसाचे पाणी योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी महापालिकेने शहरातील अनेक रस्त्यांवर जमिनीखालून स्ट्रॉम वॉटर लाइन टाकली आहे. या लाइनवर ठरावीक अंतरावर चेंबर तयार करण्यात आले आहे. काही ठिकाणी चेंबरच्या जाळ्या लोखंडी आहेत, तर काही ठिकाणी सिमेंटच्या आहेत. पाणी चेंबरमध्ये जाण्यास अडथळा होऊ नये, म्हणून जाळ्यांचे होल मोठे ठेवण्यात आले आहेत. मात्र, याचा फायदा महापालिकेच्या झाड़ूखात्याच्या कर्मचाऱ्यांनाच होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या अनेक ठिकाणचे चेंबर कचऱ्याने भरले आहेत.
पावसाचे पाणी योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी रस्त्यावर जमिनीखालून स्ट्रॉम वॉटर लाइन टाकण्यात आली. त्यावर ठिकठिकाणी चेंबर तयार करण्यात आले . असे चेंबर साफ करण्यासाठी महापालिका प्रशासन वर्षाकाठी लाखोंचे टेंडर काढते. तरी नाले, चेंबर साफ होत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर पाणी थांबते. ही बाब वेगळीच आहे. सध्या रस्ते साफसफाई करणारे कर्मचारी कामात कसूर करत असल्याचे दिसून येत आहे . दर वर्षी सर्वसामान्य नागरिकांकडून मिळकतकरात साफसफाईकर मोठ्या प्रमाणात वसूल केला जातो .मात्र महापालिका प्रशासन या रकमेतून ठेकेदार पोसण्याचे काम करीत आहे. नाले साफसफाई ठेकेदाराकडे,रस्ते साफसफाई ठेकेदाराकडे त्यामुळे सर्वच ठेकेदार गबर होत आहेत. एका ठेकेदाराने रस्त्यावरचा कचरा साफ करून चेंबरमध्ये टाकायचा. तो कचरा काढण्यासाठी दुसऱ्याने तो जादा दराने पुन्हा ठेका घ्यायचा. हा मिलीभगत व्यवहार नागरिकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचे काम महापालिका अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी)