पाण्याचा होतोय अपव्यय
By Admin | Published: April 24, 2017 04:49 AM2017-04-24T04:49:43+5:302017-04-24T04:49:43+5:30
औद्योगिकनगरी म्हणून ओळख मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात अलीकडे लग्नसोहळे जणू मेगा इव्हेंट बनले आहेत. अशा
वाकड : औद्योगिकनगरी म्हणून ओळख मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात अलीकडे लग्नसोहळे जणू मेगा इव्हेंट बनले आहेत. अशा व्हीआयपी लग्नात दिल्या जाणाऱ्या पंचतारांकित जेवणाबरोबर बाटलीबंद मिनरल पाणी देण्याची प्रथा रुजली आहे. मात्र या बाटलीबंद पाण्याच्या सोयीमुळे अशा लग्नात लाखो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे.
आयटी पार्कमुळे वाकड, हिंजवडीसह पंचक्रोशीत जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. यातूनच अलीकडच्या काळात तयार झालेल्या गुंठामंत्र्यांनी लग्नसोहळा एक प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे. त्यामुळे अशा गुंठामंत्र्यांच्या तोडीला तोड देण्यासाठी आणि आपली खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी अनेकांना नाइलाजाने लग्नात वारेमाप खर्च करावा लागत आहे. त्यामुळे प्रामुख्याने या भागात होणाऱ्या लग्न समारंभात यजमानांना पिण्यासाठी सर्रास बाटलीबंद पाणी दिले जात आहे.
साधारणत: अशा मिनरल पाण्याच्या बाटल्या बाजारात एक, अर्धा अथवा अडीचशे मिली आकारात मिळतात. मात्र एखाद-दुसरा पाहुणा सोडला, तर कोणताही माणूस एकावेळी सर्व बाटलीभर पाणी पित नाही. एक-दोन घोट पाणी पिऊन उर्वरित बाटलीबंद तिथेच ठेवली जाते. त्यामुळे प्रत्येक बाटलीत किमान ८० टक्के पाणी शिल्लक राहते. अशा अर्धवट पाण्याने भरलेल्या बाटल्यांचा अक्षरश: ढीग मंगल कार्यालयात पाहायला मिळतो. या बाटल्यांत लाखो लिटर शुद्ध पाणी तर वाया जातेच. त्याचबरोबर लाखो रुपयांचा चुराडादेखील होतो. शिवाय या बाटल्या प्रदूषणाला खतपाणी घालत आहेत. (वार्ताहर)