एप्रिलमध्ये दिवसाआड पाणी?
By admin | Published: March 18, 2017 04:49 AM2017-03-18T04:49:59+5:302017-03-18T04:49:59+5:30
उन्हाळा सुरू झाला असून, पवना धरणातील सद्य:स्थिती पाहता ५१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन सुरू आहे. एप्रिल महिन्यात दिवसाआड
पिंपरी : उन्हाळा सुरू झाला असून, पवना धरणातील सद्य:स्थिती पाहता ५१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन सुरू आहे. एप्रिल महिन्यात दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात धरणातील साठा आणि पुरवठा यांचा आढावा घेण्यासाठी पाटबंधारे विभाग व महापालिका अधिकारी यांची लवकरच बैठक होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत पाणी सोडून रावेत येथील जलउपसा केंद्रातून हे पाणी उचलले जाते. ते पाणी महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून जलवाहिनीद्वारे शहरातील विविध भागांतील नागरिकांना पुरविले जाते.
गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यातच पवना धरण १०० टक्के भरले होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध पाणीयोजना, तळेगाव, उर्से, वडगाव मावळ या भागातील पाणीयोजनांना वर्षभर पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे पाटबंधारे विभागाने सूचित केले होते. पवना धरणातून वीजनिर्मिती आणि पिंपरी-चिंचवडला पिण्यासाठी दिवसाला ४५० एमएलडी पाणी सोडले जाते. पवना धरणाची एकूण क्षमता १० टीएमसी आहे.
पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रवीण लडकत म्हणाले, ‘‘या धरणात आजअखेर ५१ टक्के पाणीसाठा आहे. दरम्यानच्या कालखंडात धरण १०० टक्के भरल्याने दिवसाआड पाण्याचा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर दिवसातून एकवेळ पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले होते. त्यामुळे सध्या शहरात एकवेळ पाणीपुरवठा आहे. आता उन्हाळा सुरू झाला आहे. पाणीसाठा कमी झाल्यास जलसंपदा विभागाच्या वतीने महापालिकेला सूचना केली जाते. पाणी पुरवठ्यासंदर्भात पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला जाणार आहे. महिनाभरात या संदर्भात आढावा घेण्यात येणार असून, तसेच महापालिकेतील महापौर, उपमहापौर, विविध पक्षांचे गटनेते यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतरच पाणीकपातीचा निर्णय होईल. ही बैठक महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत होईल.
पाण्याचे आपत्कालीन नियोजन
पवना धरणातील पाणीसाठा हा जून अखेरपर्यंत पुरणार आहे.
मात्र, याबाबत पाटबंधारे आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली जाईल. धरणातील पाणीसाठा आणि पावसाचा
अंदाज घेऊन, साठा किती दिवस पुरेल याचा आढावा घेऊन त्यानंतर निर्णय घेतला जाईल. पाण्याचे आपत्कालीन नियोजन करणे गरजेचे असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जूनअखेरपर्यंत पुरेल इतका साठा
पवनानगर : पवना धरणात ५१ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून जूनअखेरपर्यंत पाण्याची चिंता नाही. पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्याचा पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणात या वर्षी समाधानकारक साठा शिल्लक आहे. धरणाची साठवण क्षमता १० टीएमसी असून पाच टीएमसी पाणी शिल्लक आहे. पाणी पातळी ६०७ मीटर इतकी असून, १२३ मीटर इतका उपयुक्त साठा आहे. तर मागील वर्षी १६ मार्चअखेर ३९% पाणी साठा शिल्लक होता. त्या तुलनेत १२% इतका पाणी साठा जादा आहे. धरणातून दररोज १२०० क्युसेकने ७ तास पाणी विसर्ग केला जात आहे. या वर्षी २४१८ मिलीमीटर इतका पाऊस झाला होता. त्यामुळे धरण १००% भरले होते, तर गतवर्षी ते ८०% भरले होते. (वार्ताहर)
धरणात ५१ % इतका पाणी साठा शिल्लक असला तरी पाण्याची काटकसर करण्याची सवय लावून घेणे गरजेचे आहे शिवाय पुढे पाऊस कधी येईल, किती पाऊस पडेल या बाबत नक्की काही सांगता येणार नाही. त्यामुळे महापालिका व पाटबंधारे विभागाला आपत्कालीन नियोजन करावे लागणार आहे. तसेच नागरिकांनी काटकसर करून पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे.
- मनोहर खाडे, शाखा अभियंता