प्रक्रिया करूनही पाणी दूषितच
By admin | Published: March 22, 2017 03:07 AM2017-03-22T03:07:55+5:302017-03-22T03:07:55+5:30
पुणे महानगरपालिकेने मुळा-मुठा नदीतील मलजल व रसायनयुक्त व सांडपाण्यावर प्रक्रिया करून जुन्या मुठा उजव्या कालव्यात
पुणे : पुणे महानगरपालिकेने मुळा-मुठा नदीतील मलजल व रसायनयुक्त व सांडपाण्यावर प्रक्रिया करून जुन्या मुठा उजव्या कालव्यात सोडल्याचा दावा वारंवार केला आहे. परंतु, आजही नदीतील पाण्यावर सुमारे चार ते सहा फूट केमिकलयुक्त फेसाचा डोंगर दिसत आहे. या केमिकलयुक्त पाण्यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हेच पाणी महानगरपालिकेने प्रक्रिया करून ते कालव्यात सोडले आहे का, असा प्रश्न लोणी काळभोर येथील स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
पुणे शहराला जादा पाण्याची आवश्यकता होती, त्या वेळी पाणी घेतल्यानंतर तयार झालेले सांडपाणी प्रक्रिया करून, ते जुन्या कालव्याद्वारे शेतीस पुरवावे, अशी अट घालण्यात आली होती. १९९७ मध्ये हा करार झाला. गरजेएवढे पाणी उचलले गेले. परंतु, मुंढवा येथे पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी कालव्यात सोडण्यासाठी सुमारे शंभर कोटी रुपये खर्च करून जॅकवेल प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. परंतु, नदीतील पाण्यावर येत असलेला फेस पाहता या पाण्यावर १०० टक्के प्रक्रिया करणे पुणे महानगरपालिकेस शक्य झालेले नाही ही बाब सिद्ध होते.
मुंढवा जॅकवेल प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व विद्यमान पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी हवेली व दौंड तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतीस यापुढे बारमाही पाणी मिळणार, या कल्पनेने तर मुळा - मुठा नदीचे पाण्यावर अवलंबून असलेले थेट सोलापूरपर्यंतचे नागरिक व शेतकरी मुळा-मुठा नदी कायमस्वरूपी प्रदूषणातून मुक्त होणार म्हणून सुखावले होते. २६ डिसेंबर २०१६ रोजी महानगरपालिकेने नदीतील पाणी कालव्यात सोडण्यास सुरुवात केली. हे पाणी प्रक्रिया न करता जसेच्या तसे सोडण्यात आल्याने हे मलजल व पाणी पाहून सर्वांचा भ्रमनिरास झाला.
(प्रतिनिधी)