महापालिकेच्या चुकीमुळे नागरिकांच्या घरात पाणीच पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 01:09 PM2019-02-15T13:09:35+5:302019-02-15T13:11:52+5:30
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या नवीन जलवाहिनीचे काम या भागात केले गेले होते. याच कामात केले गेलेले दुर्लक्ष व हलगर्जीपणा समोर आला आहे.
बोपखेल : येथील रामनगर भागात पहाटे पाचच्या सुमारास झोपलेल्या नागरिकांना आपण पाण्यावर तरंगण्याची अनुभूती आली. खडबडून जागे झालेल्या नागरिकांना नेमके समजेनाच की घरात पाणी कसे आले. पाऊसही पडला नाही मग जमिनीतून पाणी कसे आले. काही नागरिक भीतीने घराच्या बाहेर आले व पाणी नेमके कुठून येत आहे याचे कारण शोधले असता महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या नवीन जलवाहिनीचे काम या भागात केले गेले होते. याच कामात केले गेलेले दुर्लक्ष व हलगर्जीपणा समोर आला आहे.
नवीन जलवाहिनी जोडल्या नंतर वाहिनीचा शेवटचे तोंड बंद केले नव्हते. त्यामध्ये प्लास्टिक गोणीचा बोळा कोंबून तसेच बुजवण्यात आले होते. पहाटे पाणी सोडल्यावर हे पाणी जमिनीतून थेट येथील आठ ते दहा घरांमध्ये शिरले. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्य भिजले त्यामुळे येथील नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. महापालिका प्रशासनाने अशाप्रकारे केलेल्या अर्धवट कामामुळे नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला आहे. पाणी पुरवठा विभागास संपर्क केला असता हे सर्व चुकून झाले अशी माहिती मिळाली.
पाणी पुरवठा कर्मचाऱ्यास माहिती मिळाल्यावर पाणी पुरवठा बंद करण्यात आला मात्र तो पर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले होते. आता या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. या सर्व घटनेमुळे महापालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.