कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

By admin | Published: March 23, 2017 04:19 AM2017-03-23T04:19:45+5:302017-03-23T04:19:45+5:30

सध्या कांदाकाढणी अंतिम टप्प्यात असून, बाजारभाव नसला तरी शेतकरी कांदा विकण्याची लगबग करत आहे.

Water on the eyes of farmers due to onions | कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

Next

तळेगाव दाभाडे : सध्या कांदाकाढणी अंतिम टप्प्यात असून, बाजारभाव नसला तरी शेतकरी कांदा विकण्याची लगबग करत आहे.
मावळ तालुक्यातील वडगाव, माळवाडी, कोटेश्वर वाडी, इंदोरी, जांबवडे, सुदुंबरे, खालुंब्रे आदी भागामध्ये सध्या रब्बी हंगामातील कांदाकाढणी अंतिम टप्प्यात आहे.
गतवर्षी कांद्याच्या कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांवर कोसळलेल्या कुऱ्हाडीची जखम ताजी असताना चालू वर्षीसुद्धा हा बाजारभाव शेतकऱ्यांचे ‘पानिपत’ करत आहे. चालू वर्षीही भाव नाही. साठवायचा तर, गतवर्षी सडलेल्या, उकिरड्यावर फेकलेल्या कांद्याचा वास अद्यापही गेलेला नाही. गतवर्षी कांद्याने शेतकऱ्यांची मोठी दैना केली. उत्पादन भरपूर निघाले पण बाजार ‘डाऊन.’ सोन्यासारखा माल कवडीमोल भावाने विकताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. बहुतांश शेतकऱ्यांनी ह्यया बाजारभावात कांदा विकूनही साधी मजुरीही भागात नाहीह्ण म्हणून कांदा साठवणे पसंत केले.
त्यामुळे शेतकऱ्यांना गतवर्षीचा कटू अनुभव असल्याने यावर्षी कांदा ठेवण्याचा कोणताच शेतकरी विचार करत नाही. पुणे, नगर या ठिकाणी बाजारभाव नाहीत. दोन पैसे जरा बऱ्यापैकी मिळतील या आशेने येथील शेतकरी सोलापूर, कोल्हापूर अशा लांबच्या बाजारपेठा गाठत आहे. मात्र ‘सब घोडे बारा टक्के’ असाच अनुभव त्याला सर्वत्र येत आहे. उलट वाहतूक खर्च वाढतो व अधिक तोटा होतो. मात्र हा तोटा सहन करून शेतकरी कांदा मात्र घरी न ठेवता विक्रीसाठीच पाठवत आहे. (वार्ताहर)
शेतीविरोधी धोरणाने कांदा उत्पादक हतबल-

पिंपरी : जिल्ह्यात कांदा व भाजीपाला उत्पादनात अग्रेसर असलेल्या मावळ तालुक्यातील शेतकरी वर्ग राज्य व केंद्र शासनाच्या शेतीविरोधी धोरणामुळे आर्थिक हतबल झाला आहे. ही परिस्थिती वेळीच सुधारली नाही तर विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसारखी आत्महत्या करण्याची वेळ दूर नसल्याची भीती शेतकरीवर्गात पसरली आहे.
गेली दोन वर्षे शेतकरीवर्ग नगदी पीक कांदा तसेच टॉमेटो व भाजीपाला वर्गातील पिकांचे उत्पादन करण्यासाठी बँका तसेच सोसायटीतून कर्जे उचलून त्यासाठी खर्च केले आहेत. तयार झालेला माल कवडीमोलाने बाजारात विकला गेल्यामुळे या पिकांचा भांडवली खर्चदेखील वसूल झालेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांची सध्या ‘आई भीक मागू देत नाही, बाप पोट
भरून देत नाही’ अशी अवस्था झाली आहे.
शेती सोडून शेतकरी दुसरे काही करू शकत नाही. शेती केली तर मायबाप सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतात उत्पादित झालेल्या शेतमालाचा भांडवली खर्चदेखील वसूल होत नाही. मग शेतकरीवर्गाने जगायचे कसे, हा गहन प्रश्न शेतकरीवर्गाला पडला आहे. भाजीपाला खाणाऱ्याला स्वस्त देण्याच्या धोरणामुळे शेतकरीवर्ग पूर्णपणे आर्थिक भरडला गेला आहे. शेतकरीवर्गाला कर्जमाफी नको, कर्जमुक्ती नको, शेतकऱ्यांना त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत पिकविलेल्या शेतमालाला भांडवली खर्चाच्या तुलनेत हमी भाव पाहिजे, अशी तीव्र भावना शेतकरीवगार्तून व्यक्त होत आहे.
शासनाने आर्थिक बजेटमधे कृषी सिंचनावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करून शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचे दाखवले असले, तरी सध्या शेतीत तयार होणारा माल जर कवडीमोल भावाने विकला जात असेल तर सध्या उत्पादन होणारा शेतमाल व सिंचनाचे क्षेत्र वाढल्यावर अधिकचा उत्पादित शेतमाल असे भरमसाट उत्पादन झाल्यावर भविष्यात शेतकऱ्यांचे काय होईल, याची चिंता सर्वसामान्य शेतकरीवगार्ला पडली आहे.
शासन हमी भावावर चकार शब्द काढत नाही. फक्त उत्पादन क्षेत्र वाढवण्यावर शासन भर देत असल्याची चिंता शेतकरीवर्गाला सतावत आहे. बाजारात शेतमालाचे दर वाढायला सुरुवात झाली, की शेतकरीवर्ग आनंदी होतो. आता शेतमालाचे चांगले चार पैसे हातात येतील व मी कर्जमुक्त होईन, अशी परिस्थिति निर्माण झाली की
शासन लगेच त्याला पायबंद घालते. त्यामुळे शेतकरी अधिकच
कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. शेतकऱ्याला आता कोणीच
वाली नाही अशी शेतकरीवर्गाची भावना आहे.

Web Title: Water on the eyes of farmers due to onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.