कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By Admin | Published: May 4, 2017 12:06 AM2017-05-04T00:06:29+5:302017-05-04T00:06:29+5:30

रब्बी हंगामातील कांदा काढणी आता संपत आली आहे. मात्र कांद्याच्या दरातील घसरण अद्यापही सुरूच आहे. शेतकरी

Water on the farmers' eyes | कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

googlenewsNext

 कारेगाव : रब्बी हंगामातील कांदा काढणी आता संपत आली आहे. मात्र कांद्याच्या दरातील घसरण अद्यापही सुरूच आहे. शेतकरी मात्र कांदा विक्रीसाठी लगबग करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामात कांदा हे महत्त्वाचे पीक असून ते मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्यातील बहुतांश भाग जिरायती असल्याने व कांदा चार ते पाच महिन्यांत निघत असल्याने कांदापीक घेण्यास शेतकरी प्राधान्य देतात. मागील वर्षीच्या तुलनेत सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने कांदापिकाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली. त्यामुळे उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाले, परंतु बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. तरीही शेतकरी कांदा विकण्यास प्राधान्य देत आहे. आता तर दोन ते तीन रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे. अपवादानेच कोणा तरी शेतकऱ्यांना चार रुपये दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च सोडाच विक्री खर्च भागवताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील काही वर्षात कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा चाळीचे काम झाले आहे; परंतु मागील वर्षी ठेवलेला कांदा बाजारभावाअभावी तसाच राहिला. त्या सडलेल्या कांद्याचा उकीरड्यावरील वास अद्यापही गेला नाही. यंदा चांगले उत्पन्न होऊनही बाजार मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
बाजार कमी असल्याने कांदा व्यापारी यांना पैशाची खात्री नसतानाही शेतकरी कांदा विकत आहे. मार्केटमध्ये बाजार सतत कमी होत असल्याने व्यापारी कांदा घेऊनही पैसे देताना घासाघीस करत आहेत. तर काही ठिकाणी पैसे देण्यास विलंब करत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. पुणे मार्केटला योग्य बाजार मिळत नसल्याने शेतकरी वाशी, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात कांदा पाठवत आहेत; परंतु सब घोडे बारा टक्के असाच अनुभव त्याला येत आहे. काही शेतकरी परराज्यात बंगलोर, कोचीनला माल पाठवत आहेत. परंतु, वाहतूक खर्च अधिक असल्याने त्याला तोटाच सहन करावा लागत आहे.
राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच दररोज आभाळ निघत असल्याने शेतकऱ्यांला कांदा विकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे मिळेल त्या भावात कांदा शेतकरी विकत आहेत.(वार्ताहर)

शासनाने अनुदान देण्याची गरज""

सद्य:स्थितीमध्ये शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढतच चालला आहे. कांदापिकाला मागील तीन वर्षांपासून योग्य व किफायतशीर दर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे. त्यासाठी शासनाने कांद्याला अनुदान देण्याची गरज असल्याची शेतकऱ्यांत चर्चा आहे. तसेच कांदा दरातील घसरण दररोज सुरूच असल्याने शेतकऱ्यांसाठी कांद्याची नाफेडच्या माध्यमातून खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे.
मार्चअखेरीस पीककर्ज नवे-जुने करण्यासाठी घेतलेले सावकारी कर्ज कसे फेडायचे, हा नवा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आहे. कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
 

Web Title: Water on the farmers' eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.