दीपोत्सवासाठी सोडले गणेश तलावात पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 02:01 AM2018-11-11T02:01:44+5:302018-11-11T02:02:00+5:30
पाणीपुरवठा विभागाचा अजब कारभार : प्रशासन घालतेय कर्मचाऱ्यांना पाठीशी
पिंपरी : महापालिकेत पाणीपुरवठा विभागाचा मनमानी कारभार सुरू आहे. शहरात पाणीटंचाई सुरू असताना दीपोत्सवासाठी प्राधिकरणातील गणेश तलावात पाणी सोडले होते. दीपोत्सवानंतर पाणी बंद करण्यात आले आहे. पाणी सोडण्याचे महापालिका प्रशासनाने समर्थन केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरणातील आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ गणेश तलाव उद्यान आहे. तलाव आणि उद्यान असे भाग केले आहेत. तलाव परिसरात प्राधिकरणातील एका नगसेवकांच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन केले होते. त्यासाठी पाडव्याच्या दिवशी पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पाऊस नसतानाही गणेश तलावातील धबधबा सुरू होता. त्यामुळे सुमारे तीन फूट खाली गेलेला तलाव भरला आहे. असा प्रकार गणेशोत्सव विसर्जन काळातही झाला होता. विसर्जनाच्या कालखंडातही पाणी सोडले होते. हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रातून सोडले जाते.
जलउपसा केंद्रातून शुद्धीकरण टाक्यांमध्ये आणून सोडले जाते. तेथून प्रक्रिया करून हे पाणी जलवाहिनीद्वारे शहरातील विविध भागांत सोडले जाते. सध्या नदीतून पाणी उपसण्यात अनियमितता आहे. तसेच खंडित वीजपुरवठ्याचेही कारण देऊन पाणीपुरवठा विभाग शहरात पाणीटंचाई करीत आहे. केवळ आश्वासनांचा पाऊस पाणीपुरवठा विभागाकडून पाडला जात आहे. पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पाणीपुरवठ्यात कोणतीही चूक झाली, नागरिकांना त्रास सहन करावा लागला, तर दोषींवर कारवाई करू, असा सज्जड दम आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भरला होता. मात्र, पाणीपुरवठा विस्कळीतच झालेला आहे. गणेश तलावामधील पाणीपुरवठ्या संदर्भात एका अधिकाºयाला विचारले असता, मला याबाबत माहिती नाही. माहिती घेतो असे उत्तर दिले.
वास्तव निराळेच, आयुक्तांची दिशाभूल
याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निदर्शनास ही बाब लक्षात आणून दिली असताना त्यांनी समर्थन केले. ‘‘ही नियमित प्रक्रिया आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील स्वच्छतेनंतर अनावश्यक पाणी आठवड्याला सोडले जाते,’’ असे आयुक्तांनी सांगितले. गणेश विसर्जन आणि नगरसेवकांकडून आयोजित केलेला दीपोत्सव अशा दोनदाच पाणी सोडल्याचे आढळून आले. असे या गणेश तलावावर दररोज नागरिक चालायला जातात, त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यावरून अधिकारी हे आयुक्तांची दिशाभूल करीत आहेत, हे दिसून येते.