महापालिका सोडतेय उत्पन्नावर पाणी
By Admin | Published: October 15, 2016 02:54 AM2016-10-15T02:54:52+5:302016-10-15T02:54:52+5:30
नियोजनाच्या अभावामुळे येथील नागरिकांच्या खिशाला दंडाची चाट पडत आहे. तर महापालिका उत्पन्नाच्या स्रोतावर पाणी सोडत आहे. पार्किंगसाठी जागा असूनही पार्किंगच्या समस्येने
निगडी : नियोजनाच्या अभावामुळे येथील नागरिकांच्या खिशाला दंडाची चाट पडत आहे. तर महापालिका उत्पन्नाच्या स्रोतावर पाणी सोडत आहे. पार्किंगसाठी जागा असूनही पार्किंगच्या समस्येने डोके वर काढल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र परिसरामध्ये दिसत आहे. पण, डोळ्याला पट्टी बांधणाऱ्या अधिकाऱ्यांना जाग कधी येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
टिळक चौकात पीएमपीचा मुख्य बसथांबा असून, येथून पिंपरी-चिंचवड शहरासह पुण्यातील विविध भागांत बस सुटतात. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिक आहे. यासह विविध मुख्य शासकीय कार्यालयेदेखील याच परिसरात आहेत. त्यामुळे या चौक परिसरात नेहमीच वर्दळ असते. वाहनांसाठी वाहनतळ असतानाही त्या
ठिकाणी वाहने उभी केली जात नसल्याने रस्त्यावरच ती वाहने अस्ताव्यस्त उभी असतात.
निगडीतील टिळक चौकात असलेल्या संत तुकाराम व्यापार संकुलात वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था असूनही त्याचा वापर होत नसून, वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहेत. त्यामुळे हे प्रशस्त वाहनतळ धूळ खात पडून आहे.
अनेक ठिकाणी जागेअभावी वाहनतळाचा प्रश्न निर्माण होत असताना निगडीतील व्यापार संकुलात मात्र उलट परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. प्रशस्त पार्किंग असतानाही त्याचा वापर होत नाही.
आकुर्डी रेल्वेस्थानकाच्या परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी उभ्या केलेल्या असतात. यामुळे वाहतूककोंडी होण्यास भर पडत आहे. ‘नो पार्किंग’चा फलक लावला असतानाही त्याच्या समोरच वाहने राजरोसपणे उभी असतात. (वार्ताहर)