पाणीविक्रीत बनावटगिरी
By admin | Published: April 20, 2017 06:59 AM2017-04-20T06:59:08+5:302017-04-20T06:59:08+5:30
उन्हाळ््यामध्ये हॉटेलमध्ये किंवा कुठे फिरण्याच्या निमित्ताने बाहेर पडले की पाणी विकत घेतल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे सध्या बाटलीबंद पाणी व जार पाण्याच्या
भोसरी : उन्हाळ््यामध्ये हॉटेलमध्ये किंवा कुठे फिरण्याच्या निमित्ताने बाहेर पडले की पाणी विकत घेतल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे सध्या बाटलीबंद पाणी व जार पाण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सार्वजनिक नळाचे पाणी देऊन काळाबाजार सुरू असून, लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. विशेषत: बस स्थानक, हॉटेल्स, लग्न कार्यक्रम यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी दुकानदारांकडून देण्यात येणारे बाटलीबंद पाणी खराब येऊ लागल्याने अशी बाटली घ्यावी की नाही याबाबत लोकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात बाजारात ‘मिनरल वॉटर’च्या नावाखाली सध्या विकल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्याची तडाखेबंद विक्री चालू आहे. पाण्याचा पैसा करण्याचा हा उद्योग फोफावला असताना या दिवसात दरवर्षी मिनरल वॉटरची कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याचे बघायला मिळते. बाटलीबंद पाण्याच्या नावाखाली अनेक कंपन्या पाण्याची विक्री करीत आहेत. त्यात दूषित पाणी असल्याचे दिसून येत असल्याच्या तक्रारी आहेत.
गेल्या काही दिवसांत शहरातील सामाजिक संस्थातर्फे उभारण्यात येणाऱ्या पाणपोयांची संख्या कमी झाल्यामुळे लोकांना पाण्याची बाटली घेण्याशिवाय पर्याय नसतो. एक लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत २० रुपये आहे. गेल्या काही वर्षांत शीतपेय तयार करणाऱ्या नामांकित कंपन्या बाटलीबंद पाण्याची विक्री करीत आहेत. आरोग्यासाठी शुद्ध पाण्याची गरज ओळखून पाणी विक्रीसाठी लहान-मोठ्या ५० पेक्षा जास्त कंपन्या भोसरी परिसरात बाटलीबंद पाणी विक्री करीत आहेत.
भोसरी परिसरात पाण्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही ज्या ठिकाणावरून पाणी जार आणि डब्यांमध्ये भरून ग्राहकांपर्यंत पोचवतो. तिथे पाणी शुद्धीकरणाची मशिनरी व यंत्रे लावलेली आहेत पण अधिक नफा व कमी वेळेत जास्त उत्पन्नाच्या लालसेपोटी बहुतेक वेळा थेट नळाचे पाणी भरून दिले जाते. थंड पाण्याच्या डब्यांत एक दिवस आधी पाणी भरून फ्रिजरमध्ये ठेवले
जाते. दुसऱ्या दिवशी ते
ग्राहकांपर्यंत पोचवले जाते. याकडे अन्न, औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. एखादी दुघर्टना घडल्यानंतरच जाग येणार का? असा प्रश्न शहर परिसरातील नागरिकांमधून विचारला जात आहे. (प्रतिनिधी)