केवळ अर्धा तासच पाणी; वाल्हेकरवाडीकरांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 01:58 AM2018-11-03T01:58:27+5:302018-11-03T01:58:49+5:30
महापालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी वाल्हेकरवाडीकरांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.
रावेत : यंदाच्या पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरासह शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रातही भरघोस पाऊस पडला. पवना धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली, असे बोलले जात होते. मात्र महापालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी वाल्हेकरवाडीकरांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. ‘धरण उशाला, कोरड घशाला’, अशी स्थिती सध्या वाल्हेकरवाडी प्रभाग क्र. १७ मध्ये आहे. कोणतीही पूर्व कल्पना न देता पाणीकपात करण्यात आली. शुक्रवारी सकाळी केवळ अर्धा
तासच पाणीपुरवठा करण्यात आला. तोही कमी दाबाने झाला. त्यामुळे पुरेसे पाणी नागरिकांना मिळाले नाही.
येथील गावठाण, लक्ष्मीनगर, भोंडवेनगर, सायली कॉम्प्लेक्स, चिंतामणी चौक, बळवंतनगर, चिंचवडेनगर आदी भागात मागील काही दिवसांपासून पाणी कमी दाबाने आणि अपुºया प्रमाणात येत होते. त्यातच गुरुवारी सायंकाळी आणि शुक्रवारी सकाळी काही भागात पाणी आले नाही. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांवर ‘पाणी’ संकट ओढवले आहे. काही दिवसांपासून सातत्याने विस्कळीत होणाºया पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. गेल्या काही दिवसांपर्यंत नियमितपणे सर्वांना पुरेल एवढा पाणीपुरवठा होत होता. परंतु मागील काही दिवसांपासून पाणी कमी दाबाने आणि अपुरा पुरवठा होत आहे. काही भागात पुरेसा तर काही भागात कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत आहे. काही भागात अत्यंत कमी पाणी येत असल्याने नागरिकांना विकत पाणी घेण्याची वेळ येत आहे.
काही दिवसांपासून पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रभाग १७ मध्ये दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. नेहमीच्या पाणीटंचाईमुळे नागरिकांचे विशेषत: महिलांचे हाल होत आहेत. पिण्यासाठी व दररोजच्या वापरासाठी लागणारे पाणी या भागातील नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागत आहे.
हंडा मोर्चा काढण्याचा महिलांचा इशारा
वाल्हेकरवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे़ तरी वाल्हेकरवाडी आणि परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत व पूर्ण दाबाने चालू करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला, तर कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा या भागातील महिलांनी दिला आहे.
चाकरमान्यांची धावपळ
सकाळी नियमितपणे ज्या भागात पाणीपुरवठा होतोे त्या भागात अचानकपणे महापालिका प्रशासनाने कोणतीही पूर्व कल्पना न देता पाणीपुरवठा खंडित केला. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. साधारणत: सकाळी १० वाजता परिसरात पाणीपुरवठा करण्यात आला. तोही कमी दाबाने आणि केवळ अर्धा तासच पुरवठा झाला. त्यामुळे चाकरमान्यांची एकच धावपळ उडाली.
नियोजनाचा अभाव
पाणीपुरवठ्याबाबत नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून येते. पाणीपुरवठा ही तातडीक सेवा आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांच्या बजेटसह महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. शहरात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार रावेत येथील बंधाºयातून दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा केला जातो. मात्र त्याचे वितरण करताना योग्य नियोजन केले जात नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.
शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा करणाºया व्हॉल्व्हचा दरवाजा अचानक बंद झाला. त्यामुळे परिसरात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. बिघाड लक्षात आल्यानंतर तत्काळ दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
- सुनील अहिरे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा, ब प्रभाग
वाल्हेकरवाडी - रावेत मार्गावर असणाºया व्हॉल्व्हची झडप अचानक बंद झाल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला होता. तत्काळ संबंधित विभागाला कळवून सदर व्हॉल्व्हची लागलीच दुरुस्ती करून घेतली आहे. वाल्हेकरवाडी परिसराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
- सचिन चिंचवडे, उपमहापौर