पिंपरी-चिंचवड परिसरातील जलवाहिनी फुटली; मोशी, चऱ्होलीचा पाणीपुरवठा बंद
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: April 11, 2024 03:25 PM2024-04-11T15:25:11+5:302024-04-11T15:26:06+5:30
भोसरी, मोशी, चऱ्होली आदी भागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे....
पिंपरी : शहराच्या पुर्व भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गुरूवारी सकाळी ११ च्या सुमारास अचानक फुटली. जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून गेले. पाणी उपसा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. यामुळे भोसरी, मोशी, चऱ्होली आदी भागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
गुरूवारी सायंकाळी अनेक भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सुर्यवंशी यांनी दिली.
जलवाहिनी फुटल्याची बाब लक्षात येईलपर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर या वाहिनीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. पाणी उपसा करण्यासाठी मोटारपंप लावण्यात आले. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या टीमने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. जलवाहिन्या दुरूस्त झाल्यांनतरच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या भागांतील पाणीपुरवठा बंद
चऱ्होली, मोशी, डूडूळगाव, बोऱ्हाडेवाडी, चोवीसवाडी, वडमुखवाडी, देहू रस्ता, चक्रपाणी वसाहत, इंद्रायणी नगर, सद्गुरूनगर, प्राधिकरणातील सेक्टर नंबर ४, ६, ९, ११, १३ येथील पाणीपुरवठा बंद झाला आहे.
जलवाहिनी फुटल्याने शहरातील पुर्व भागाकडे या वाहिनीद्वारे होणारा पाणीपुरवठा काही गुरूवारी बंद करण्यात आला. दुरुस्तीचे काम सुरू आहे. ते झाल्यानंतर वाहिनीद्वारे शहरातील टाक्यांमध्ये पाणी सोडण्यात येईल. टाक्या लगेच भरणार नाहीत. त्यामुळे किमान दोन दिवस शहरातील पुर्व भागांतील पाणीपुरवठ्याचे टप्पे विस्कळित राहतील.
- अजय सुर्यवंशी, कार्यकारी अभियंता, महापालिका