पाणी समस्येच्या तक्रारी, आरोपांनी सत्ताधारी हैराण

By admin | Published: May 31, 2017 02:21 AM2017-05-31T02:21:06+5:302017-05-31T02:21:06+5:30

पाणीटंचाई जाणवू नये म्हणून काटकसरीच्या धोरणानुसार एक दिवासाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले. मात्र, हा सर्व

Water problem complaints, allegations against ruling Awadh | पाणी समस्येच्या तक्रारी, आरोपांनी सत्ताधारी हैराण

पाणी समस्येच्या तक्रारी, आरोपांनी सत्ताधारी हैराण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पाणीटंचाई जाणवू नये म्हणून काटकसरीच्या धोरणानुसार एक दिवासाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले. मात्र, हा सर्व खटाटोप टँकर लॉबीसाठी आणि लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आळंदीला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला, असे आरोप होऊ लागले आहेत. आरोप करण्यापेक्षा ज्या भागात पाणी नाही, त्याबद्दल कळवा, उपाययोजना केली जाईल. पाणी कपात रद्दसाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असे महापौर नितीन काळजे, सभागृहनेते एकनाथ पवार यांनी सांगितले. शहरात २ मे पासून दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. महापौर आणि सत्ताधारी भाजपा नगरसेवकांच्या टँकर लॉबीसाठीच पाणीकपात करीत आहेत, असा थेट आरोप विरोधकांकडून होत आहे. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यामुळे मंगळवारी आयुक्त दालनात पाणीपुरवठा विषयक तातडीची बैठक घेण्यात आली.
महापौर नितीन काळजे अध्यक्षस्थानी होते. उपमहापौर शैलजा मोरे, सभागृहनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसेविका सुमन पवळे, नामदवे ढाके यांच्यासह आयुक्त श्रावण हर्डीकर, सहशहर अभियंता रवींद्र
दुधेकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे आदी उपस्थित
होते.
महापौर काळजे म्हणाले, पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाईला सामोरे जाऊ लागू नये म्हणून २५ टक्के पाणीकपात केली होती. परंतु, अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. यापुढील काळात २५ टक्के पाणी कपात कमी करून ती १० टक्यांवर आणली जाईल.
ज्या परिसरात कमी दाबाने पाणी येत आहे. त्या परिसरात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल. नळांना विद्युत मोटार लावून उपसा करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाचा अंदाज आल्यावर पाणीकपात रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. येत्या आठ दिवसांत आढावा घेणार असल्याचे महापौर काळजे यांनी सांगितले.

तक्रारीसाठी हेल्पलाइन, दिवसाआडच पाणीपुरवठा
पाणीपुरवठ्याच्या अधिक तक्रारी ज्या प्रभागातून येतील त्या प्रभागातील कनिष्ठ अभियंता, व्हॉल्व्हमन यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, असे आदेश महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी पाणीपुरवठा विषयक बैठकीत दिले.
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत म्हणाले, रोज पाणीपुरवठा सुरू असताना ४७० एमएलडी पाणीउपसा केला जातो. उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या तीव्र होते. त्यामुळे पवना धरणातून आता ३९० ते ४०० एमएलडी पाणीउपसा केला जात आहे. या बैठकीनंतर त्यात १० टक्के वाढ केली जाईल. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये घट होईल.
नागरिकांनी पाणी पुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी ७७२२०६०९९९ या हेल्पलाइन क्रमांकावर कराव्यात. त्याची दखल घेऊन तातडीने निराकरण केले जाईल. जून- जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यावर पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी दिवसाआडच पाणीपुरवठा केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Water problem complaints, allegations against ruling Awadh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.