पिंपरीत नियोजनाअभावी पाणी टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 01:43 AM2018-10-18T01:43:35+5:302018-10-18T01:43:46+5:30
पिंपरी : पवना धरण १०० टक्के भरले असताना शहरात पाणीटंचाई आहे, याबाबत सत्ताधाऱ्यांनी कंठशोष करूनही प्रशासन ढिम्म आहे. पाणीपुरवठा ...
पिंपरी : पवना धरण १०० टक्के भरले असताना शहरात पाणीटंचाई आहे, याबाबत सत्ताधाऱ्यांनी कंठशोष करूनही प्रशासन ढिम्म आहे. पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक आज झाली. पाणीपुरवठा विभागाच्या निष्क्रियतेवर सत्ताधाºयांनी जोरदार टीका केली. नियोजनाअभावी पाणीटंचाई झाली असून, दोन दिवसांत पाणी सुरळीत झाले नाही, तर प्रशासनाविरोधात आंदोलन करू, असा इशारा महापौर राहुल जाधव यांनी दिला आहे.
शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिक, नगरसेवक त्रस्त आहेत. तक्रारी वाढू लागल्याने महापौरांनी आज पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. महापौरांसह पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, उपमहापौर सचिन चिंचवडे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांच्यासह कार्यकारी अभियंते, उपअभियंते, पाणी सोडणारे कर्मचारी उपस्थित होते.
महापौर जाधव म्हणाले, ‘‘शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यास पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी कारणीभूत आहेत. अनेक सूचना देऊनही दखल घेतली जात नाही. आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नांना जर पाणीपुरवठा विभाग उत्तरे देऊ शकत नसेल, तर दुर्दैवाची बाब आहे. धरण शंभर टक्के भरले आहे. मात्र, पाणी आरक्षणानुसार मिळत आहे. पाणीपुरवठा विभागाचा कारभार सुधारायला हवा. नियोजनाअभावी पाणीटंचाई आहे. नागरिक आम्हाला प्रश्न विचारतात. त्यांना उत्तर द्यावे लागते. निष्क्रिय प्रशासनाला वठणीवर आणण्याची गरज आहे. कामचुकार अधिकारी कोणीही असो, आता त्याची गय केली जाणार नाही. दोन दिवसांत पाणी सुरळीत झाले नाही, तर त्यास जबाबदार अधिकाºयावर कारवाई केली जाईल. निलंबित केले जाईल. तरीही कामात सुधारणा न झाल्यास जनतेसाठी मी आंदोलन करीन.
प्रशासनाचा हलगर्जीपणा
पाणी पुरेसे असूनही टंचाई आहे. नियोजन नसल्यामुळे हे घडत आहे. त्यास प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी आज बैठक झाली. गळती शोधण्याची गरज आहे. तसेच जे काम करणार नाहीत किंवा पाणीटंचाईस कारणीभूत असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक प्रभागातील पाणीपुरवठ्याची माहिती विचारली होती. मात्र, त्याचे उत्तरही देता आले नाही, असे सत्तारुढ गटनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.