पिंपरी-चिंचवड शहरात हिवाळ्यातही जाणवतेय पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 03:31 AM2018-01-10T03:31:17+5:302018-01-10T03:31:27+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे हिवाळ्यातही पाणीटंचाई जाणवत असून, उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होऊ नये, म्हणून जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठविले आहे. ‘गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाणी उपसा करू नये, पाणी जपून वापरावे, अशा सूचना केल्या आहेत.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे हिवाळ्यातही पाणीटंचाई जाणवत असून, उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होऊ नये, म्हणून जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठविले आहे. ‘गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाणी उपसा करू नये, पाणी जपून वापरावे, अशा सूचना केल्या आहेत.
महापालिकेस मावळातील पवना धरणातून पिण्याचे पाणी पुरविले जाते. धरणातून नदीत सोडून हे पाणी रावेत येथील जलउपसा केंद्रातून शहरातील पाण्याच्या टाक्यांत नेले जाते. तेथून जलवाहिन्यांतून नागरिकांपर्यंत पोहोचविले जाते. पवना धरणातून दिवसाला ४७० पाणी उचलले जाते. शहराची लोकसंख्या साडेबावीस लाखांवर पोहोचली आहे. समाविष्ट गावांतही मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प साकारत आहेत. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाºयांनीही प्रशासनास धारेवर धरले आहे. उपमहापौर शैलजा मोरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
- जलसंपदा विभागाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागास पत्र दिले आहे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू नये, याची काळजी आत्तापासूनच घेणे गरजेचे असून, आरक्षित कोट्याशिवाय अधिक पाणी उचलू नये, मंजूर कोटाच उचलावा अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी जपून वापरावे लागणार आहे.