सिद्धिविनायकनगरीत पाणीटंचाई
By admin | Published: March 31, 2017 02:48 AM2017-03-31T02:48:02+5:302017-03-31T02:48:02+5:30
देहूरोड कॅन्टोन्मेन्ट हद्दीतील निगडीतील सिद्धिविनायकनगरी, दत्तनगर परिसरात पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होत
देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेन्ट हद्दीतील निगडीतील सिद्धिविनायकनगरी, दत्तनगर परिसरात पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होत असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत मावळचे आमदार, महापालिका पदाधिकारी व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पदाधिकारी व संबंधित नागरिक यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत चर्चा झाल्यांनतर संबंधित भागात पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन महापौर नितीन काळजे यांनी दिले .
महापौर काळजे यांच्या कक्षात झालेल्या बैठकीला मावळचे आमदार बाळा भेगडे, महापौर नितीन काळजे, आयुक्त दिनेश वाघमारे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका सीमा सावळे, नामदेव ढाके, बाळासाहेब ओव्हाळ, सारंग कामतेकर, कॅन्टोन्मेन्ट मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, बोर्डाच्या उपाध्यक्षा अॅड. अरुणा पिंजण, सदस्य विशाल खंडेलवाल, रघुवीर शेलार, भाजपचे देहूरोड शहराध्यक्ष कैलास पानसरे, तानाजी काळभोर यांच्यासह संबंधित भागातील नागरिक उपस्थित होते. कॅन्टोन्मेंट हद्दीतील वॉर्ड क्रमांक पाच व सहात निगडीतील सिद्धिविनायकनगरी, दत्तनगर, समर्थनगरी, परमार कॉम्प्लेक्स, आशीर्वाद कॉलनी हा भाग येतो. या भागात सुमारे दहा हजार लोकसंख्या असून, सुरुवातीपासून महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र गेले काही दिवस लोकसंख्येच्या तुलनेत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना टॅँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ येत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले.
या वेळी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या वतीने महापौर काळजे व आयुक्त वाघमारे यांना निवेदन देण्यात आले.
(वार्ताहर)
सर्वत्र पाणीटंचाई जाणवू लागली असून, पाणीपुरवठा करताना अडचणी येत आहेत. संबंधित भागात पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, महापालिका व कॅन्टोन्मेंटचे अधिकारी स्थळपाहणी करून लवकरच पाणीपुरवठा समस्येवर तोडगा काढतील.
- नितीन काळजे, महापौर
४आमदार भेगडे यांनी पुरेसा पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. चर्चेत महापौर काळजे, नगरसेविका सावळे, बोर्ड सदस्य खंडेलवाल, महापालिकेचे पाणीपुरवठा विभागातील अधिकारी रामदास तांबे, विशाल कांबळे यांनी भाग घेतला. सध्या फक्त दीड लाख लिटर पाणीपुरवठा होत असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले.