तळेगावात १५ जूनपासून पुरेसा पाणीपुरवठा
By Admin | Published: May 31, 2017 02:04 AM2017-05-31T02:04:06+5:302017-05-31T02:04:06+5:30
गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा प्रश्नास सर्वोच्च प्राधान्य देत यंत्रणेतील दोष दूर करून तळेगाव
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव दाभाडे : गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा प्रश्नास सर्वोच्च प्राधान्य देत यंत्रणेतील दोष दूर करून तळेगाव आणि स्टेशन विभागातील नागरिकांना येत्या १५ जूनपर्यंत पुरेसा, सुरळीत आणि नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात पवना व इंद्रायणी नदीवरील पंपासाठी २४ तास वीजपुरवठा करणारे एक्स्प्रेस फीडर्स बसविण्यात आले असून, त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी उचलणे शक्य होणार आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा समितीचे सभापती सुनील शेळके यांनी दिली.
भाजपा, तळेगाव शहर जनसेवा विकास समिती आणि आरपीआय यांच्या गेल्या पाच महिन्यांतील सत्ताकाळातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शेळके यांनी ही माहिती दिली. या वेळी आमदार बाळा भेगडे, ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, सभागृह नेते सुशील सैंदाणे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, नगरसेविका सुलोचना आवारे, नगरसेवक इंदरमल ओसवाल, सचिन टकले आदी उपस्थित
होते.
तळेगावातील पाणी प्रश्नाबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता युद्धपातळीवर असल्याचे सांगून शेळके म्हणाले की, शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तीन टप्प्यात पाणी योजनेच्या सक्षमीकरणाचा संकल्प आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून १६ एमएलडी पाणी पवना नदीवरून उचलण्याची परवानगी नुकतीच प्राप्त केली आहे. इंद्रायणी नदीवरूनही १० एमएलडी पाणी उचलण्यासाठी आवश्यक यंत्रणा सुसज्ज केली आहे. एक्स्प्रेस फीडर्समुळे अखंडित वीजपुरवठा प्राप्त झाला असून त्यामुळे संपूर्ण शहरास नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. येत्या ७ जून रोजी त्याचे उद्घाटन होत आहे.
तळेगाव शहरासाठी दीर्घकालीन इंद्रायणी योजनेसाठी ६३ कोटी रुपये खर्चास राज्य शासनाने मंजुरी दिल्याचे आमदार भेगडे यांनी सांगितले.
स्मार्ट नियोजनाने मोठी बचत
पाणी योजनेतील दुरुस्ती, सुधारणा आणि सक्षमीकरण करताना स्मार्ट नियोजन केल्याने खर्चात मोठी बचत झाली आहे. इंद्रायणी योजनेची पाणी क्षमता ५ एमएलडीवरून १० एमएलडी करण्यासाठी २ कोटी ९३ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु, ती केवळ ६४ लाखातच पूर्ण केली. दोन कोटी २० लाख रुपयांची बचत केली. सोमाटणे पंपासाठी दरमहा १९ लाख रुपये वीजबिलाचा खर्च येतो. त्यात तांत्रिक बदल केल्याने सुमारे चार लाखाची बचत होणार आहे. अतिरिक्त पाणी उचलले गेल्याने गेली चारपाच वर्षे दरमहा ५५ हजार रुपयांचा दंड जीवन प्राधिकरणाकडे भरावा लागत असे. आता जादा पाणी उचलण्याची परवानगी प्राप्त केल्याने तो खर्चही वाचणार आहे. याच पंपावरील मोटारीसाठीच्या एक कोटी ९३ लाख खर्चातून ४६ लाख रुपयांची बचत केली आहे. पुढील वर्षात दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचा संकल्प आहे. - सुनील शेळके, उपनगराध्यक्ष