पिंपरी चिंचवड शहराचे आठवड्यातून एक दिवस पाणी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 07:42 PM2019-02-28T19:42:36+5:302019-02-28T19:45:09+5:30
पवना धरणातील पाणी साठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात एक मार्चपासून पाणी कपात करण्यात येणार असून आठवडयातून एक दिवस विभागनिहाय पाणीपुरवठा बंद राहणार आहे
पिंपरी : पवना धरणातील पाणी साठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात एक मार्चपासून पाणी कपात करण्यात येणार असून आठवडयातून एक दिवस विभागनिहाय पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
मावळातील पवना धरणातून पिंपरी -चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिका दिवसाला धरणातून ४८० एमएलडी पाणीउपसा करते. परंतु, पाण्याचा जपून वापर करण्याकरिता रावेत बंधा-यातून दैनंदिन ४४० दक्षलक्ष लीटर एवढ्याच पाण्याचा उपसा करण्याबाबत जलसंपदा विभागाने कळविले आहे. धरणात आजमितीला केवळ पन्नास टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी धरणात साठ टक्के साठा होता. म्हणजेच दहा टक्के पाणीसाठा जास्त होता. यावर्षी केवळ पन्नास टक्के आहे. उन्हाळ्यामध्ये वहनतूट, बाष्पीभवन, सिंचन, घरगुती वापर इत्यासाठी पाण्याच्या वापरामध्ये वाढ होत असते. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने पाणी वापरात कपात करण्याबाबतची कार्यवाही तत्काळ करण्याचे कळविले आहे. त्यानुसार शहराच्या पाणी वापरामध्ये कपात करण्यासाठी सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस पाणीबंद करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार उद्यापासून विभागनीहाय एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.
पाणी वापर काटकसरीने करा
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘धरणात पाणीसाठा कमी असल्याने नागरिकांनी फरश्या, वाहने धुण्यासाठी, बगीचा इत्यासाठी महापालिका पुरवित असलेल्या पाण्याचा वापर करु नये. घरातील, इमारतींमधील, नळांमधुन, पाईप्समधून होणारी पाणी गळती बंद करावी. टाक्यांमधून पाणी ओव्हर फ्लो होऊ नये देऊ नये. महापालिकेच्या पाईपलाईनमधून होत असलेली गळती त्वरित पाणीपुरवठा विभागास कळवावी. सारथी हेल्पलाईनवर तक्रार करावी. पावसाची अनिश्चितता, धरणातील वेगाने कमी होत असलेला पाणीपुरवठा याचा विचार करता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.’’