पाण्याच्या टाक्या ठरताहेत धोकादायक
By admin | Published: March 21, 2017 05:18 AM2017-03-21T05:18:30+5:302017-03-21T05:18:30+5:30
येथील परांडेनगरमध्ये चार दिवसांपूर्वी साडेतीन वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
दिघी : येथील परांडेनगरमध्ये चार दिवसांपूर्वी साडेतीन वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. टाकीत पडून मृत्युमुखी पडण्याची ही दिघीतील दुसरी घटना होय. त्यामुळे परिसरात होत असलेल्या बांधकामावरील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, बांधकाम व्यावसायिक यांनी सुरक्षिततेच्या नियमाला बगल दिल्याने निष्पाप मुलांचे नाहक बळी जात असल्याचे वास्तव आहे.
दिघी परिसरात बांधकामांना पेव फुटले आहे. रस्तोरस्ती, गल्ली-बोळात सर्रास बांधकामांना ऊत आला आहे. या बांधकामावर असलेल्या मजूर, ठेकेदार यांच्याकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठलेही नियम पाळले जात नाहीत.
उंच ठिकाणी काम करताना सेफ्टी बेल्टचा वापर टाळत बांधकामावरील कामगार वर्ग जिवावर उदार होऊन काम करताना दिसतो. हेल्मेट, गॉगल, हातमोजे, सेफ्टी बूट अशी सुरक्षेबाबतची कुठलीही साधने, साहित्य ठेकेदाराकडूनच पुरविले जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याशिवाय बांधकाम क्षेत्रात धोकादायक ठरणाऱ्या जागा सुरक्षिततेच्या उपाययोजना न करता वाऱ्यावर सोडून दिले असतात. यामध्ये बांधकामांना लागणाऱ्या पाण्याचा साठा करण्यासाठी भूमिगत बांधलेल्या पाण्याच्या टाक्या उघड्यावर सोडलेल्या असतात.
दिघीतील परांडेनगरमध्ये पाण्याच्या टाकीत पडून सुमीत अनिल चौहान या साडेतीन वर्षाच्या बालकाचा अंत झाला. तर एका बांधकामावर एक कामगार खालून विटा फेकत होता व दुसरा कामगार त्या वरच्यावर झेलत गोळा करत असताना हातातील निसटलेली वीट बालकाच्या डोक्यात पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. सुरक्षेचे उपाय नाकारल्याने त्याची झळ आपल्याच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला सोसावी लागल्याचे समोर आले आहे. बांधकामावर बांधलेल्या पाण्याच्या टाक्या सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे.
प्रत्येक बांधकामावर हिच परिस्थिती आहे. प्रतिबंधक उपाय म्हणून त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने मजबूत झाकण करणे सोईचे असताना लाकडी फळी टाकून वेळ निभावून नेली जाते. हीच दुर्लक्षित केलेली बाब जवळपास खेळणाऱ्या लहान मुलांच्या जिवावर उठली असून, टाकीमध्ये बालक पडण्याच्या घटना घडत आहेत.
लहान मुलांच्या जिवाशी खेळणाऱ्या व या घटनांना जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. जेणेकरून अशा घटना वारंवार घडणार नाहीत. (वार्ताहर)