सांडपाण्याने वाढली जलपर्णी; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रदूषणात होतेय वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:13 AM2018-07-25T01:13:10+5:302018-07-25T01:14:02+5:30
दूषित पाण्यामुळे नदीपात्रात जलपर्णीचे साम्राज्य
- विलास भेगडे
तळेगाव दाभाडे : इंद्रायणी नदीपात्रात सांगवी ते इंदोरी या सुमारे १२ किमीच्या टप्प्यात नदीकाठावरील गावांचे मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडले जात असल्याने या भागातील नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे नदीपात्रात जलपर्णीचे साम्राज्य पसरले आहे.
नदीकाठावर सांगवी, कातवी, वारंगवाडी, आंबी, वराळे, नाणोली तर्फे चाकण, तळेगाव दाभाडे, माळवाडी, इंदोरी ही गावे वसलेली आहेत. यातील बहुतेक गावांतील सांडपाणी नैसर्गिक उतारामुळे सरळ इंद्रायणी नदीपात्रात जात आहे. यामुळे जलपर्णी वाढली असून, डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पावसाळ्यात इंद्रायणी नदीत वाहून येत असलेल्या जलपर्णी, मैलायुक्त सांडपाणी,कचरा यामुळे इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले असून वेळीच दखल न घेतल्यास इंद्रायणीची गटारगंगा होण्यास वेळ लागणार नाही. तळेगाव स्टेशनसह अनेक गावांचे मैलायुक्त सांडपाणी नदीपात्रात जात असल्याने प्रदूषणात भरच पडली आहे. आंबीसह आंबी एमआयडीसीचे दूषित पाणी इंद्रायणी नदीपात्रात येते.
आंबी आणि इंदोरी येथे जनावरे धुण्याचे प्रमाण अधिक आहे. नदीकाठावर महिला मोठ्या प्रमाणावर धुणी-भांडी करताना दिसतात. नदीपात्रात सर्रास जनावरे धुतली जात आहेत. कारखानदारीचे दूषित पाणी, काठावरील गावांचे सांडपाणी, नदीपात्रात सोडल्याने होणारे परिणाम माहिती असूनही या गंभीर बाबीची दखल ग्रामस्थ, स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाकडूनही घेतली जात नाही. तळेगाव नगर परिषद हद्दीतील मोठया प्रमाणात सांडपाणी ओढ्यामार्गे इंद्रायणी नदीतच येते. शिवाय अंत्यविधीनंतरची राख, निर्माल्य, धुणीभांडी व जनावरे धुणे आदी कारणांनी इंद्रायणी प्रदूषणात भर पडते. अनेक भाविक इंदोरी पुलाजवळ अंत्यविधीनंतरची राख सोडतात. त्यामुळे या ठिकाणी पाण्याचे अधिक प्रदूषण झाले आहे.
वारंगवाडी ते इंदोरी या टप्प्यातील इंद्रायणीमुळे सुमारे ८० टक्के क्षेत्र बागायती झाले असले, तरी शेतकऱ्यांना नाईलाजाने हे दूषित पाणीच भाजीपाला व बागायती क्षेत्राला द्यावे लागत आहे. नदीकाठावरील बहुतेक गावांचा नळपाणीपुरवठा इंद्रायणी नदीवरच अवलंबून आहे. अनेक ग्राम पंचायतींकडे सक्षम जलशुद्धीकरण यंत्रणा नसल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते.