भक्ती शक्ती चौकात अधिकारी आणि विक्रेत्यांमध्ये हमरी-तुमरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 07:09 PM2018-05-18T19:09:31+5:302018-05-18T19:42:32+5:30
भक्ती-शक्ती चौकामध्ये बीआरटीचे काम सुरू आहे. याठिकाणी रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना हटविण्यात आले आहे.
पिंपरी : निगडीतील भक्ती-शक्ती चौक...गर्दी जमलेली..,विक्रेत्याची आरोळी....,रात्री उशिरापर्यंत पार्टया करता आणि दुसºया दिवशी सायंकाळ झाल्यावर परत अतिक्रमण विभागाच्या गाड्या घेऊन येता, वर आम्हाला शिव्या देता, अधिकारी झाले म्हणून काय झाले... काही सर्वसामान्यांच्या पोटाचाही विसर तुम्हाला कसा पडू शकतो... तर या विक्रेत्याला ‘संबंधित’ अधिकाऱ्याची शिवराळ भाषा.. हा संवाद कानावर पडल्यावर क्षणभर आपल्या डोळ्यासमोर एखादया चित्रपटातील प्रसंग उभा राहील. पण हा ‘सु- संवाद ’अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि विक्रेत्यांमध्ये गुरुवारी सायंकाळी रंगला होता. पण भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या विक्रेत्याने ‘अधिकारी पदाचा वरचष्मा’ मान्य करत अखेर हात जोडून स्वारी म्हणत माघार घेतल्यानंतर हा वाद निवळला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, भक्ती-शक्ती चौकामध्ये बीआरटीचे काम सुरू आहे. या ठिकाणी रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना हटविण्यात आले आहे. त्यांनी मुंबई-पुणे रस्त्यावर ठिय्या मांडला आहे. गुरुवारी सायंकाळी अतिक्रमण विभागाचे पथक त्याठिकाणी आले. त्यांनी चायनीज विक्रेत्याला रस्त्यावरून गाडी काढण्यास सांगितले. त्या विक्रेत्याने त्याला विन्रम नकार दिला. त्यावरून विक्रेत्याला संबंधित अधिकाऱ्याने शिवराळ भाषा वापरली. यावरून दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात हमरी-तुमरी झाली. दोघांमध्ये समझोता करण्याचा प्रयत्न एक महिला करत होती. पण विक्रेता आणि अधिकारी दोघेही ऐकण्यास तयार नव्हते. अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार देण्याची धमकी दिली. सर्व जणांच्या पोटावर पाय येईल, ही भीती विक्रेत्यांच्या मनात घर करून लागली अखेर विक्रेत्यांनी हात जोडले. ज्या विक्रेत्याची अधिकाऱ्याची भांडणे झाली. त्याला सर्व विक्रेत्यांनी अधिकाऱ्यासमोर हात जोडण्यास सांगितले. विक्रेत्यानेही डोळ्यांत पाणी आाणून सर माझ्यावर काहीही कारवाई करा, पण इतरांसाठी मी माफी मागतो. अतिक्रमण पथक आलेल्या पावली परत गेले.
याबाबत बोलताना अतिक्रमण पथक प्रमुख अरुण सोनकुसरे म्हणाले, भक्ती-शक्ती चौकात आम्ही कारवाईसाठी गेलो होतो. त्या ठिकाणी विक्रेत्यांनी रस्त्यात टेम्पो उभा केल्याने जागा अडली होती. तो टेम्पो हटविण्याबाबत सूचना केली असता अरेरावीची भाषा करत त्यांनी वाद घातला. दरम्यान, कारवाई झाली नाही. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा कारवाई करणार आहे.
माझे हात लांबपर्यंत
या पथकातील अधिकारी विक्रेत्यांना धमकाविताना माझे हात लांबपर्यंत आहेत. सर्व पीआय, एसीपी माझे दोस्त आहेत. एकही वाहन रस्त्यावर लावू देणार नाही, अशी धमकी देत होता, असे विक्रेत्यांनी सांगतिले. ते अधिकारी कोण, याची ही चर्चा रंगली होती.
हातावरचे पोट
निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्पाभोवती पर्यटकांची गर्दी असते. औद्यगिक सुटी गुरुवारी आणि रविवारी या ठिकाणी मोठी गर्दी असते. गेले अनेक वर्षे या ठिकाणी विक्रेते व्यवसाय करत आहेत. हॉकर्स झोननुसार त्यांना जागा मिळाली नाही. त्यामुळे त्यांना रस्त्यावर ठिय्या मांडावा लागतो. त्यांना हप्तेखोरीचा त्रास सहन करावा लागतो. विरोध केल्यास व्यवसाय बंद पाडला जातो, अशी कुजबुज विक्रेत्यांमध्ये सुरू होती.