‘आम्ही इच्छुक नाही, परंतु पक्षाने...' लोकसभेच्या उमेदवारीबाबत जगताप कुटुंबीय स्पष्टच बोलले
By विश्वास मोरे | Published: June 28, 2023 01:47 PM2023-06-28T13:47:05+5:302023-06-28T13:47:25+5:30
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी एकदा लोकसभा निवडणूक लढविली होती पण खासदार होण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली
पिंपरी : भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता आहे. पिंपरी, चिंचवड की भोसरी विधानसभेला संधी मिळणार याबाबतची चर्चा रंगली आहे. अध्यक्षपदाबाबत प्रक्रिया सुरू आहे का? आणि बदल होणार आहे का? यावर ‘बदल तर हवाच’, असे सूचक विधान चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी चिंचवड येथील पत्रकार परिषदेत आज केले.
देशात आणि राज्यात जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी पत्रकार परिषद झाली. सुरूवातीला चिंचवड विधानसभा मतदारसंघातील एक लाख कुटुंबांपर्यंत पोहचण्याचा भाजपाचा संकल्प आहे, असे जगताप यांनी सांगितले. यावेळी माजी महापौर उषा ढोरे , भाजपा प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य शंकर जगताप, विधानसभा संयोजक मोरेश्वर शेडगे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, संतोष कलाटे, संकेत चोंधे, उज्वलाताई गावडे, संयोजक शत्रुघ्न काटे उपस्थित होते.
शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू
यावेळी शहराध्यक्ष निवडीबाबत काही हालचाली सुरू आहेत का? नवीन शहराध्यक्ष निवडले जाणार आहेत याबाबत आमदार जगताप यांनी भूमिका जाहिर केली. त्यातून शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पक्ष पातळीवर सुरू असल्याचे दिसून आले.
संधी दिल्यास जगताप कुटुंबातून उमेदवार
मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शंदे गटात प्रवेश केला आहे. तर शिंदे गट पिंपरी-चिंचवडमध्ये अॅक्टीव्ह झाला आहे. तर मावळ लोकसभा मतदार संघात भाजपाची ताकद अधिक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी मावळमध्ये पक्षाची बांधणी सुरू आहे. हा मतदार संघ भाजपाला मिळाला तर तयारी आहे, असे विधान केले होते. तर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी एकदा लोकसभा निवडणूक लढविली होती. खासदार होण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. लोकसभा मतदार संघ भाजपाला आल्यास जगताप कुटुंबातील उमेदवार असेल का? यावर शंकर जगताप यांनी सुरूवातीस उत्तर देण्याचे टाळले. पुन्हा प्रश्न विचारल्यावर जगताप म्हणाले, ‘आम्ही इच्छुक नाही. परंतु पक्षाने निर्णय घेतला तर आमची हरकत नाही. पक्षाचा जो आदेश असेल तो मान्य राहिल.’’