बोलतो तेच करतो, म्हणून इतिहास घडवू शकलो: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By विश्वास मोरे | Published: February 22, 2023 11:16 PM2023-02-22T23:16:09+5:302023-02-22T23:16:47+5:30
सत्ता आणि खुर्चीच्या मोहापायी शिवसेनेला दावणीला बांधण्याचे पाप; आम्ही मोठा कार्यक्रम केला
पिंपरी: गेल्या विधानसभा निवडणूकीत युतीला मतदारांनी कौल दिला. त्यानंतर मात्र, अघटीत घडल. आयुष्यभर ज्यांना बाळासाहेबांनी विरोध केला. सत्ता आणि खुर्चीच्या मोहापायी काहींनी त्यांच्या दावणीला शिवसेनेला बांधण्याचे पाप केले. सत्तेवर आल्यानंतरही कारभार ठप्प राहिला. हट्ट आणि अहंकारापायी प्रकल्प बंद पडले. ही चूक असल्याची लोकभावना निर्माण झाली. त्यामुळे आम्हांला मोठा कार्यक्रम करावा लागला. तो आम्ही केला. मी बोलतो तेच करतो. म्हणून इतिहास घडवू शकलो. आम्ही मोठा कार्यक्रम केला. कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. सत्तेची हवा डोक्यात जाऊ देणार नाही, मी जागता पहारा देणारा मुख्यमंत्री आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केले.
रहाटणी येथील शिवेंद्र लॉन्समध्ये चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपा महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, मंत्री तानाजी सावंत, माजी खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, भरत गोगावले, उमा खापरे, शंकर जगताप, विजय शिवतारे आदी उपस्थित होते.
श्रेय कोणाला घ्यायचे त्याला घेऊ द्या
लोकसेवा आयोगाच्या परिक्षांसंदर्भातील प्रश्नांचा उल्लेख करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘लोकसेवा आयोगाच्या परिक्षांबाबत आणि विद्यार्थ्यांची भूमिका मला पटली आहे. याबाबत मी दोनवेळा आयोगाला पत्रही लिहले आहे. काही जण श्रेय घेत आहेत. श्रेय घ्यायचे त्यांना घेऊद्यात. आपण काम करीत राहू.’’
आता मोर्चा काढावा लागणार नाही
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नांवर आता मोर्चा काढावा लागणार नाही. हा प्रश्न ठाण्याप्रमाणे कायमचा निकालात काढला जाईल. सिडकोप्रमाणे प्राधिकरणाचा साडेबारा टक्क्याचा विषय तातडीने मार्गी लाऊ. पाण्याचा प्रश्न, इंद्रायणी, पवना नदी सुधार प्रकल्प आराखडा तयार करायला सांगितला आहे. पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोला मंजुरी देण्याची सूचना केली आहे. पुणे रिंगरोड लवकरच सुरू करू. ’’
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘सत्तेवर येताच अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. मी लोकांमध्ये मिसळतो. त्यांना भेटतो. म्हणून त्यांचे प्रश्न जाणतो. पूर्वी काय परिस्थिती होती, या खोलात मी जात नाही.’’
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"