'भाजपाला गुजरातेत आम्ही रोखू शकलो नाहीत. मात्र महाराष्ट्रात तुम्ही रोखा'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 07:38 AM2019-09-19T07:38:33+5:302019-09-19T07:39:24+5:30
संविधान दिन सोहळा समिती, पिंपरी चिंचवड शहर व आरडीएएम यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथे भारतीय संविधान जनजागरण अभियान कार्यक्रमाचे आयोजित बुधवारी करण्यात आले होते.
पिंपरी : भाजपाला गुजरातेत आम्ही रोखू शकलो नाहीत. मात्र महाराष्ट्रात तुम्ही रोखा. त्यासाठी सर्व पक्षांनी भाजपाच्या विरोधात एकत्र आले पाहिजे. अन्यथा विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या ८० जागाही येणार नाहीत, असे मत गुजरातमधील आमदार व आरडीएएमचे राष्ट्रीय अध्यक्ष जिग्नेश मेवाणी यांनी व्यक्त केले.
संविधान दिन सोहळा समिती, पिंपरी चिंचवड शहर व आरडीएएम यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथे भारतीय संविधान जनजागरण अभियान कार्यक्रमाचे आयोजित बुधवारी करण्यात आले होते. या वेळी आमदार मेवाणी बोलत होते. मानव कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, सुलक्षणा शिलवंत धर, मारुती भापकर, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, डॉ. सुरेश माने आदी या वेळी उपस्थित होते.
आमदार मेवाणी म्हणाले, ‘‘जनतेने सांगितले नाही, मात्र यांनीच महाजनादेश यात्रा काढली आहे. शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत. पिण्याचे पाणी देण्याची यांची औकात नाही. गायीचा मुद्दा पुढे करून महत्त्वाच्या मुद्यांवरून भरकटवले जाते. केवळ एक राष्ट्र व अस्मिता यावरून भावनिक आवाहन करतात. विविध जातींचे ते केवळ एक पॅकेज आहे. देशातील अस्पृश्यता संपुष्टात येत नाही तोपर्यंत राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही. बाबासाहेबांनी सांगितले आहे की, मनुवाद व पुंजीवाद आपले शत्रू आहेत. सध्या त्यांचे महागठबंधन झाले असून, ते आपल्याला तोडावे लागेल. त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.’’
कोळसे पाटील म्हणाले, ‘‘गुंडांच्या राज्याला मत देणार नाही, याची शपथ एल्गार परिषदेत घेतली. मात्र खोटे खटले भरले. विचारवंतांना आत टाकले. एका समाजात शंभर पक्षाला मानणारे आहेत. त्यामुळे मोदी, शहा यांच्यासारखे लोक निवडून आले. सर्व बहुजन समाज एकत्र येत नाहीत तोपर्यंत आपले राजकारण पासंगाचे आहे. त्यासाठी बहुजन समाज एकत्र आणायचा आहे.’’
‘‘महावीर, बुद्ध, कबीर अशा थोरांचा, महामानवांचा हा देश आहे. मात्र काही जणांकडून रामाचे नाव विकण्यात येत आहे. असे हे नागपूरवाले लोक डरपोक आहेत. हेमंत करकरे यांचा खून करण्यात आला. अशा शहीद करकरेंना आपण अभिवादन केले पाहिजे. - जिग्नेश मेवाणी, आमदार, गुजरात