'आम्हीही साध्या वेशातील पोलीस होऊन समाजासाठी काम करू...' पिंपरीत विद्यार्थ्यांची प्रतिज्ञा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 04:57 PM2023-01-04T16:57:29+5:302023-01-04T16:57:38+5:30
सामान्यांसाठी अविरत सेवा देत असलेल्या पोलिसांच्या कर्तव्यतत्परतेबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांना केला ‘सॅल्यूट’
पिंपरी : पोलीस स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी बुधवारी चिंचवड पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलिसांच्या कामकाजाची माहिती घेतली. आम्हीही साध्या वेशातील पोलीस होऊन समाजासाठी काम करू, अशी प्रतिज्ञा त्यांनी यावेळी केली. तसेच सामान्यांसाठी अविरत सेवा देत असलेल्या पोलिसांच्या कर्तव्यतत्परतेबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांना ‘सॅल्यूट’ केला.
चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, निरीक्षक (गुन्हे) प्रकाश जाधव, श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे सतीश भारती, धनंजय कुलकर्णी आणि शांतता समितीचे सदस्य सुभाष मालुसरे उपस्थित होते. श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या विभागाचे अकरावी शास्त्र शाखेचे विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. पोलीस उपनिरीक्षक व्यंकट पोटे यांनी पोलीस ठाण्यात चालणाऱ्या कामकाजाबाबत माहिती दिली.
स्वागत कक्षापासून सर्व विभागांची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली. पोलिसांच्या कामकाज सर्वसामान्य नागरिकांनी समजून घेऊन सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नागरिक हे साध्या वेशातील पोलीस असतात, त्यानुसार आम्ही देखील पोलिसांना सहकार्य करून त्यासाठी साध्या वेशातील पोलीस म्हणून सतर्क राहणार, अशी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. चिंचवड पोलीस ठाण्याचे सागर आढारी यांनी संयोजन केले.