कोरोना संकट दूर करण्यासाठी श्री म्हातोबा रायाला घालणार साकडे; इतिहासात पहिल्यांदाच उत्सवात खंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 01:48 PM2020-04-08T13:48:08+5:302020-04-08T13:59:39+5:30
मुळशी तालुका, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येथे जमतात.
पिंपरी : आज चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती, वाकड-हिंजवडीसह तमाम मुळशी तालुक्याचे व पुणे जिल्ह्यातील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री म्हातोबा देवाची प्रसिद्ध बगाड मिरवणूक व यात्रा. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे यात्रा रद्द करण्यात आली असून विधीवत, पूजा-अर्चा करून देशावरील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी श्री म्हातोबा रायाला साकडे घालणार असल्याचे वाकड-हिंजवडी ग्रामस्थ व उत्सव कमिटीने सांगितले.
तीन दिवसीय उत्सवात बगाड मिरवणूक, दुसऱ्या दिवशी वाकडला काट्याची पालखी मिरवणूक, देवाचा छबिना यांसह दोनही गावात तमाशा, ऑर्केस्ट्रा, संगीत रजनी अशा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तिसऱ्या दिवशी निमंत्रित नामवंत मल्लांच्या जंगी कुस्त्यांच्या आखाड्याने सांगता होत असते. मात्र, हे सर्व कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आले असून ग्रामस्थांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मास्क, सॅनिटायझर वाटप, औषध फवारणी आदींचे आयोजन करून सामाजिक जबाबदारी भान जपले आहे.
शेकडो वर्षांपासून सुरु असलेल्या या ऐतिहासिक बगाड मिरवणूकीत पहिल्यांदाच खंड पडला आहे. दरवर्षी हनुमान जयंतीला दुपारी ४ नंतर हिंजवडी गावठाणातून वाकडच्या दिशेने बगाड मिरवणूक निघते. मिरवणूक पाहण्यासाठी व दर्शनासाठी मुळशी तालुका, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने येथे जमतात. इसवी सन सोळाशे पस्तीस सालापासून म्हातोबा महाराजांचे वाकड हिंजवडीत अस्तित्व असल्याचे मानले जाते.
महाराजांचे मूळ ठाणे असलेल्या बारपे आडगावच्या (मुळशी) घनदाट जंगलात पायी जाऊन शेलेकरी बगाडाचे लाकूड आणतात. ग्रामस्थांच्या मदतीने पारंपारिक पद्धतीचा वापर करून बगाडाची उभारणी केली जाते, हिंजवडीत जांभूळकर परिवाराचे मूळ तीन वाडे आहेत. दरवर्षी तीन पैकी एका वाड्यातील विवाहित सदस्याची गळकरी म्हणून निवड केली जाते.गळकर याला हनुमान मंदिरात दर्शनासाठी नेऊन त्याला बगाडावर बसविले जाते. दुपारी साडे चारच्या सुमारास बगाडाच्या मिरवणुकीला हिंजवडी गावठाणातून सुरुवात होते आणि वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिर परिसरात मिरवणुकीची सांगता होते.