काळाचा घाला! डबक्यात बुडून दोन लेकरांसह वडिलांचा मृत्यू; तिघेही गेले होते धबधबे पाहायला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 05:46 PM2021-07-25T17:46:57+5:302021-07-25T17:51:20+5:30
डबक्यात दोन मुले बुडू लागल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात पिराजी यांचाही बुडून मृत्यू झाला.
कामशेत : कुसगाव खुर्द येथे ढंढाबे पाहायला गेलेल्या दोन लेकरांसह वडिलांचा पाण्याच्या खोल डबक्यात बुडून मृत्यू झाला आहे. पिराजी गणपती सुळे (वय ४५ ) , साई पिराजी सुळे( वय १४), सचिन पिराजी सुळे (वय १२) रा.इंद्रायणी काॅलनी कामशेत, अशी मृत्यू पावलेल्या बापलेकांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पिराजी दोन्ही लेकरांना घेऊन कुसगाव खुर्द येथील धबधबे पहायला गेले होते. धबधब्याच्या पायथ्याशी उत्खनन केलेल्या जागी पाण्याचे मोठे डबके साचले आहे. या डबक्यात दोन मुले बुडू लागल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात पिराजी यांचाही बुडून मृत्यू झाला.
जवळच जनावरे राखणाऱ्या एका शेतकऱ्याने यांना बुडताना पाहिले. तेव्हा त्यांनी आरडाओरड करून गावकरी गोळा झाले. त्यांना चिखलाच्या दलदलीतून बाहेर काढले पण जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस पोहोचण्यापूर्वी स्थानिक गावकऱ्यांनी मदत केली आहे.