जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बुधवारी रॅली; सकल मराठा समाजाकडून पिंपरीत बंदची हाक
By विश्वास मोरे | Published: February 12, 2024 05:54 PM2024-02-12T17:54:56+5:302024-02-12T17:56:01+5:30
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांचे बुधवारी शहर बंद ठेवून शांततेत पाठिंबा देण्याचे आवाहन
पिंपरी: मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील विविध आंदोलने करत आहेत. आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, यासाठी जरांगे पाटील गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण केले आहे. त्यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बंदला मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज शहराच्या वतीने पाठिंबा दिला आहे. बुधवारी रॅली काढण्यात येणार आहे. याबाबत बैठक झाली.
सतीश काळे म्हणाले, बंदला मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पाठिंबा दिला आहे. तसेच बुधवारी शहर बंद ठेवून शांततेत पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड शहर व मावळ तालुक्याच्या वतीने दुचाकी व चार चाकी रॅलीचे आयोजन केले आहे. रॅलीची सुरवात बुधवारी सकाळी नऊ वाजता डांगे चौक थेरगाव येथील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून होईल. रॅली तेथून पुढे काळेवाडी फाटा, जगताप डेअरी,रहाटणी, पिंपरीगाव मार्गे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे जाणार आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅली चिंचवड स्टेशन,आकुर्डी,भक्ती शक्ती समूह शिल्प निगडी कडे जाणार आहे. रॅली तळेगावमार्गे वडगावकडे रवाना होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक वडगाव मावळ येथे रॅलीचा समारोप होणार आहे.'