दोन पर्यवेक्षकांवर ६३२ शाळांचा भार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 01:57 AM2019-01-25T01:57:20+5:302019-01-25T01:57:26+5:30
महापालिकेच्या शिक्षण विभागातील पर्यवेक्षकांवरील अतिरिक्त ताण दिवसेंदिवस वाढतच आहे.
- प्रकाश गायकर
पिंपरी : महापालिकेच्या शिक्षण विभागातील पर्यवेक्षकांवरील अतिरिक्त ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील दोन महिन्यांपासून शिक्षण विभागात चार पर्यवेक्षक होते. परंतु, कामाचा अतिरिक्त भार बघून दोन पर्यवेक्षकांनी राजीनामा दिल्याने केवळ दोन पर्यवेक्षकांना शिक्षण विभागाची धुरा सांभाळण्याची वेळ आली आहे.
शहरात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १०५ शाळा असून, खासगी ५२७ शाळा आहेत. अशा एकूण ६३२ शाळांचा कारभार फक्त दोन पर्यवेक्षकांच्या खांद्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी सहा पर्यवेक्षक शाळांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करत होते. मागील दोन महिन्यांपूर्वी दोन पर्यवेक्षकांनी राजीनामा दिल्याने चार पर्यवेक्षक काम पाहत होते. मध्यंतरी चार पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्याचा ठराव घेण्यात आला होता. मात्र शिक्षण विभागातील वाढत्या कार्यभाराकडे पाहून शिक्षक पर्यवेक्षक पदावर रुजू होण्यास तयार होत नाहीत. चार पर्यवेक्षकांपैैकी दोन पर्यवेक्षकांनी राजीनामा दिल्याने आता शहरातील सर्व शाळांची जबाबदारी फक्त दोन पर्यवेक्षकांवर आली आहे.
पर्यवेक्षकांना पालिका शाळांवर नियंत्रण ठेवणे, विविध उपक्रम राबविणे, कार्यक्रमांचे नियोजन करणे, शाळांची पाहणी करणे, मुख्याध्यापक-शिक्षकांशी समन्वय राखणे अशी कामे करुन शाळांची गुणवत्तावाढ व दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. परंतु, सद्य:स्थितीत शिक्षण विभागातील पर्यवेक्षकांच्या खांद्यावर इतर कामाव्यतिरिक्त जबाबदाऱ्या टाकल्या जात आहेत. त्यामुळे शाळांकडे लक्ष कधी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कामाचा भार बघता सात ते आठ पर्यवेक्षकांची गरज आहे. एवढ्या शाळांची धुरा अवघ्या दोन पर्यवेक्षकांवर असल्याने शाळांची गुणवत्ता ढासळण्याची शक्यता आहे.
>प्रामाणिक कर्मचाºयांच्या खांद्यावरच बोजा
शिक्षण विभागामधील पर्यवेक्षकांची अतिरिक्त कामावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यवेक्षकांचे मुख्य काम दूरच राहत आहे. या विभागातील काही कर्मचारी केवळ फायली हातात घेऊन दिवसभर महापालिकेत चकरा मारताना दिसतात. मात्र जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांच्या खांद्यावर अतिरिक्त कामाचा बोजा टाकला जात असल्याचे चित्र शिक्षण विभागात दिसून येत आहे.