शिवरथ यात्रेचे कामशेतमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 00:58 IST2019-02-06T00:58:41+5:302019-02-06T00:58:52+5:30
शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ते स्वराज्याची राजधा अी रायगड मार्गे निघालेल्या शिवरथ यात्रेचे कामशेत शहरात मंगळवारी सकाळी आगमन झाले.

शिवरथ यात्रेचे कामशेतमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत
कामशेत : शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ते स्वराज्याची राजधा अी रायगड मार्गे निघालेल्या शिवरथ यात्रेचे कामशेत शहरात मंगळवारी सकाळी आगमन झाले.
या वेळी फटाके वाजवून पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. तर महिलांनी पालखीत विराजमान छत्रपती शिवाजीमहाराजांच्या
मूर्तीला औक्षण करून पालखीचे स्वागत केले. कामशेत पोलीस ठाणे ते छत्रपती शिवाजीमहाराज चौकापर्यंत पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र आयोजित शिवरथ यात्रेचे कामशेत शहरामध्ये शिवप्रेमी ग्रामस्थांकडून फटाके फोडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी छत्रपती शिवाजीमहाराज चौकात मान्यवरांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. या वेळी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पोशाखातील महाराजांच्या हस्ते नारळ फोडून मर्दानी खेळाची सुरवात करण्यात आली. लहान मुलामुलींनी दानपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी आदी चित्तथरारक खेळ सादर केले. या वेळी धाडसी खेळकऱ्यांनी डोक्यावर ठेवलेला नारळ काठीच्या साहाय्याने लीलया फोडून आणि एका युवती विरोधात तीन युवकांचे लाठी युद्ध हे विशेष आकर्षणाचा भाग ठरले. तर तरुणाने दानपट्ट्याने रस्त्यावर ठेवलेले लिंबूचे दोन तुकडे करून उपस्थितांची वाहवा मिळवली. मंगळवार कामशेतचा आठवडा बाजार असल्यामुळे चित्तथरारक खेळ पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
येथे विविध कार्यक्रम झाल्यानंतर पालखीने पुढे कार्ला मार्गे प्रस्थान केले. गुरुवार (दि. ७) रोजी रायगडावर पोहोचून राजसदरेवर महाभिषेक करून पालखीची जगदीश्वर मंदिरापर्यंत मिरवणूक काढून त्यानंतर भोजन होऊन कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचे माहिती शिवरथ यात्रा उत्सव समितीने दिली.
शिवनेरीवरून सुरुवात : कामशेतला स्वागत
शिवरथ यात्रेचे ९ वे वर्ष असून, अनेक शिवभक्तांनी या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला होता. रविवार (दि. ३) रोजी किल्ले शिवनेरीवरून निघालेल्या शिवरथ यात्रा शिवजन्मस्थळ येथे महाभिषेककरून पुढे जुन्नर, कुरण, नारायणगाव, कळंब, मंचर, पिंपळगाव खडकी, अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, जारकर वाडी, लोणी, पाबळ, केंदूर, वढू बुद्रुक, फुलगाव, तुळापूर, मरकळ, सोलू, आळंदी, चिखली, मोशी, देहू, सुदुंबरे, भंडारा डोंगर, इंदोरी, माळवाडी, तळेगाव दाभाडे, वडगाव, कान्हे मार्गे कामशेत शहारामध्ये मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पोहोचली. या वेळी मुला-मुलींनी चित्तथरारक खेळ सादर केले. उपस्थितांकडून टाळ्यांची दाद मिळाली. तसेच त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.