दुचाकी शोभायात्रेने नववर्षाचे स्वागत
By admin | Published: March 29, 2017 01:57 AM2017-03-29T01:57:02+5:302017-03-29T01:57:02+5:30
गुढी पाडवा व हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण परिसर यांच्या वतीने दुचाकीची शोभायात्रा
लोणावळा : गुढी पाडवा व हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण परिसर यांच्या वतीने दुचाकीची शोभायात्रा लोणावळा, खंडाळा ते वेहेरगाव दरम्यान काढण्यात आली.
शोभायात्रेत शेकडो दुचाकीवरून आबालवृद्ध सहभागी झाले होते. पुरंदरे ग्राउंड लोणावळा ते खंडाळा, गवळीवाडा, तुंगार्ली, वलवण, वरसोली, वाकसई चाळ, वाकसई फाटा, कार्ला फाटा येथून ही शोभयात्रा जाऊन कुलस्वामिनी एकवीरा देवीच्या वेहेरगाव येथील पायथा मंदिराजवळ समारोप झाला. तब्बल तीन तास अतिशय शिस्तबद्धपणे शोभायात्रा सुरू होती.
सहभागी दुचाकी वाहनांमुळे तब्बल साडेतीन किमी अंतराचा मार्ग व्यापला गेला होता. गुढी पाडवा व नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे जिल्ह्यात निघणारी ही सर्वांत मोठी दुचाकी शोभायात्रा असते. विशेष म्हणजे या हिंदू समितीला कोणीही पदाधिकारी नसतात. सर्वच स्तरांतील मंडळी स्वयंस्फूर्तीने शोभायात्रेचे नियोजन करतात. हिंदू बांधव सर्व राजकीय मतभेद व हेवेदावे बाजूला ठेवत उत्साहाने सहभागी होतात. महिला व युवकांचा नेहमीप्रमाणे या वर्षी उत्साह वाखाणण्याजोगा होता.
लंकेवर विजय मिळवून प्रभू रामचंद्र चैत्री पाडव्याच्या दिवशी अयोद्धेत दाखल झाले. हिंदू बांधव हा दिवस घरावर गुढी उभारून विजयदिन म्हणून साजरा करतात. गुढी पाडव्याच्या दिवशी संवत्सर बदलते व हिंदू नववर्षाची सुरुवात होते. म्हणून हा दिवस हिंदू समितीच्या वतीने उत्साहात साजरा केला.(वार्ताहर)
रथाचे आकर्षण
पुरंदरे ग्राउंड येथे सकाळी ११ वाजता नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय गवळी, माजी नगरसेविका जयश्री काळे यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रेला सुरुवात झाली. अग्रभागी प्रभू रामचंद्राची प्रतिमा असलेला रथ, त्यामागे महिला, युवक व पुरुष रॅलीमध्ये भारतमाता व छत्रपती शिवराय यांची प्रतिमा असलेली वाहने, प्रत्येक वाहनाला हिंदू ध्वज, सहभागी प्रत्येकाच्या डोक्यावर भगवा फेटा अशा शोभायात्रेमुळे लोणावळा भगवामय झाला होता.