नववर्षाचे स्वागत; जल्लोष नियमात राहूनच! पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:47 IST2024-12-30T15:45:50+5:302024-12-30T15:47:04+5:30
नववर्ष स्वागत करताना ध्वनिप्रदूषण करणाऱ्या, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार

नववर्षाचे स्वागत; जल्लोष नियमात राहूनच! पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार
पिंपरी : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसआयुक्तालयाने विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर रात्रीपासून १ जानेवारी २०२५ पर्यंत पोलिसांचा मोठा फौजफाटा शहरभर तैनात राहणार आहे.
महत्त्वाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त
नववर्षानिमित्त धार्मिक स्थळे, मंदिरे, मशिदी, मॉल, हॉटेल, लॉज आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष गस्त घालण्यात येणार आहे. महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी पॉइंट्सवर वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. रात्रीच्या वेळी मद्यपान करून वाहन चालवणारे, भरधाव वाहन चालवणारे आणि सार्वजनिक ठिकाणी अराजकता माजवणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई
वाहनांवरून अनधिकृतपणे कर्कश आवाज निर्माण करणारे किंवा ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक कारवाई होणार आहे. याशिवाय, नववर्ष स्वागताच्या उत्साहात गोंगाट किंवा सार्वजनिक ठिकाणी अनुचित वर्तन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
पोलिसांची विशेष पथके
शहरात पोलिस आयुक्त १, सहायक पोलिस आयुक्त ६, पोलिस निरीक्षक ४६, सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक १५४, पोलिस अंमलदार १५२०, क्यूआरटी पथक १, एसआरपीएफ पथक ५, स्ट्रायकिंग ८ आणि वॉर्डन ७० यांची नियुक्ती केली आहे.
ध्वनिप्रदूषण करणारे रडारवर
नववर्ष स्वागत करताना आवाजाची मर्यादा ओलांडत ध्वनिप्रदूषण केले जाते. अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. अशा उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिला आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही विशेष खबरदारी घेतली आहे. नववर्षाचे स्वागत करताना सर्वांनी वाहतूक व सामाजिक नियमांचे पालन करावे. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. -दिगंबर सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी, पिंपरी-चिंचवड