जन्मदात्या आईनेच फेकले पोटच्या गोळ्याला विहिरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 10:51 PM2017-09-15T22:51:15+5:302017-09-15T22:51:26+5:30
जन्मदाती आईनेच पोटच्या गोळ्याला विहिरीत फेकून दिल्याची घटना लोणावळ्यातील पांगोळी गावात शुक्रवारी पहाटे घडली आहे. शंभू दत्तात्रय भांगरे असे या बालकाचे नाव आहे.
लोणावळा, दि. 15 - जन्मदाती आईनेच पोटच्या गोळ्याला विहिरीत फेकून दिल्याची घटना लोणावळ्यातील पांगोळी गावात शुक्रवारी पहाटे घडली आहे. शंभू दत्तात्रय भांगरे असे या बालकाचे नाव आहे.
पांगोळी गावात राहणार्या शितल तिकोणे हीचे दिड वर्षापुर्वी उर्से गावातील दत्तात्रय भांगरे यांच्याशी लग्न झाले होते. नुकतेच आठवडाभरापुर्वी शितल ही माहेरी आईकडे आली होती. आज शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शितल हिने पोटचा गोळा असलेल्या शंभूला अचानक घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत फेकले. सकाळच्या सुमारास बाळाचे बाळूते पाण्यावर तरंगताना मिळून आले. याबाबत पांगोळी ग्रामस्त, लोणावळा शहर पोलीस व शिवदुर्ग मित्र या रेस्कू टिमने विहिर तसेच गावाचा परिसर शोधून काढला मात्र दिवसभर बाळाचा शोध लागला नाही. अखेर आयएनएस शिवाजीच्या पाणबुड्याने सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास बाळाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
शितलने पोटच्या गोळ्याला पाण्यात का फेकले याचे कारण स्पष्ट झाले नसून याप्रकरणी बाळाचे शव विच्छेदन झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.