किराणा आणायला गेला अन् अपघातात जीव गमावला; कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
By नारायण बडगुजर | Updated: March 31, 2025 21:06 IST2025-03-31T21:06:08+5:302025-03-31T21:06:20+5:30
तळेगाव स्टेशन येथे वडगाव-तळेगाव रस्त्यावर रविवारी (दि. ३०) रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.

किराणा आणायला गेला अन् अपघातात जीव गमावला; कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : किराणा साहित्य आणायला गेलेल्या दुचाकीस्वार तरुणाला कंटेनरने धडक दिली. यात डोक्यास मार लागून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तळेगाव स्टेशन येथे वडगाव-तळेगाव रस्त्यावर रविवारी (दि. ३०) रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.
निखिल रामदास ननावरे (३०, रा. मलठण, ता. फलटण, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. चंद्रप्रकाश रामकृपाल यादव (२८, रा. सुलतानपूर, जि. प्रितीपूर, उत्तरप्रदेश) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दत्तात्रय किसन राऊत (३४, रा. भिसे काॅलनी, वराळे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. ३१ मार्च) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय यांचा मेव्हणा निखिल ननावरे हे दोन दिवसांपूर्वी कामाच्या शोधानिमित्त फिर्यादी दत्तात्रय यांच्याकडे राहण्यास आले होते. दरम्यान, रविवारी रात्री किराणा साहित्य घेण्यास निखिल घरातून बाहेर पडले. त्यावेळी वडगाव-तळेगाव रस्त्यावर चंद्रप्रकाश यादव याने त्याच्या ताब्यातील कंटेनर भरधाव चालवून निखील यांच्या दुचाकीला धडक दिली. कंटेनरच्या धडकेने निखिल यांच्या डोक्यास मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच निखिल यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.
पाठलाग करून पकडले
अपघातानंतर कंटेनरचालक चंद्रप्रकाश यादव हा घटनास्थळी न थांबता पळून जात होता. त्याला पुढे जाऊन पकडण्यात येऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
कुटुंबियांना बसला धक्का
निखिल हे रात्री नऊच्या सुमारास किराणा साहित्य घेण्यासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास निखिल यांच्या फोनवरून बहीण मोनिका यांच्या फोनवर काॅल आला. निखिल यांचा अपघात झाला असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे निखिल यांची बहीण मोनिका आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला.