देवदर्शनाला गेले अन् दोघींना काळाने नेले! मावळातील १० वर्षांच्या मुलीसह वृद्धेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:59 IST2024-12-30T13:58:35+5:302024-12-30T13:59:35+5:30

आई अपघातात गंभीर जखमी झाली असून, आजी आणि मुलीचा मृत्यू झाला आहे, घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे

Went to see God and time took them both! Elderly man and 10-year-old daughter die in Maval | देवदर्शनाला गेले अन् दोघींना काळाने नेले! मावळातील १० वर्षांच्या मुलीसह वृद्धेचा मृत्यू

देवदर्शनाला गेले अन् दोघींना काळाने नेले! मावळातील १० वर्षांच्या मुलीसह वृद्धेचा मृत्यू

कामशेत : कुलदैवताच्या दर्शनासाठी मावळातील नाणेगावातून शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ३४ भाविक खासगी ट्रॅव्हल्सने मार्गस्थ झाले. परंतु, पंढरपूर रस्त्यावरील भटुंबरे गावाजवळ बसवर काळाने घाला घातला. त्यात दोघांचा मृत्यू, तर ३२ जण जखमी व १२ जण गंभीर आहेत. या अपघातात दहा वर्षांच्या मुलीने जीव गमावला असून, तिची आई गंभीर जखमी आहे. तर एका साठ वर्षीय आजीचा मृत्यू झाला आहे. लहान मुलगी आणि आजीच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

मावळ तालुक्यातील कामशेतकडून कोंडीवडेकडे जाणाऱ्या रस्त्यावर ८०० लोकसंख्येचे नाणे हे गाव. या गावातून भाविक कुलदैवत शिवगड खंडोबाच्या दर्शनासाठी जात असतात. नाणे ते पंढरपूर, शिवगड तेथून तुळजापूर, अक्कलकोट असा मार्ग असतो.

शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नंदिनी ट्रॅव्हल्स या खासगी बसने गावामधील सुमारे ३४ भाविक कुलदैवताच्या दर्शनाला निघाले. पंढरपूर तासाभराच्या अंतरावर होते, तर बसमध्ये भक्तिगीते सुरू होती. सर्वांना देवदर्शनाची ओढ लागली होती. भल्या सकाळी सहाच्या सुमारास बस भटुंबरे गावाजवळ आली आणि बसवर काळाने घाला घातला. समोरून येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. त्यात बिबाबाई सोपान म्हाळसकर (वय ६० वर्षे) व जान्हवी उर्फ धनश्री विठ्ठल म्हाळसकर (वय १० वर्षे) या दोघींचा जागीच मृत्यू झाला.

काय घडले, कसे घडले

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस पंढरपूरकडे जात असताना वाहनचालकाच्या मागील आसनावर बसलेल्या एका प्रवाशाला चालक वाहन व्यवस्थित चालवत नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही बाब इतर प्रवाशांच्या निदर्शनास आणून दिली. चालकाला गाडी काही काळ थांबवावी, अशी सूचना केली. मात्र, दीड तासाचा रस्ता शिल्लक असल्याने बसचालकाने वाहन थांबवले नाही आणि पुढे अपघात घडला.

नाणे गावावर शोककळा

कुलदैवताच्या दर्शनाला येथील भाविक जात असतात. जान्हवी उर्फ धनश्री विठ्ठल म्हाळसकर नाणेगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शिकत होती. आई वनिता यांच्याबरोबर ती दर्शनास चालली होती. अपघातात आई गंभीर जखमी झाली आहे. धनश्रीच्या पश्चात वडील, दोन बहिणी, आजी, आजोबा व चुलते असा परिवार आहे. तर बिबाबाई म्हाळसकर यांच्या पश्चात मुलगा, सून व दोन नाती असा परिवार आहे. रात्री निघालेले आपले नातेवाईक परत येणार नाहीत, याचा कोणीही विचार केला नव्हता. रविवारी दुपारी अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर अनेकांचे नातेवाईक पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. दोघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली. सायंकाळी सातच्या सुमारास दोघींचे मृतदेह गावात आणले होते. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Web Title: Went to see God and time took them both! Elderly man and 10-year-old daughter die in Maval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.