कसली कारवाई, कोण घाबरणार?अनधिकृत जाहिरातबाजी व फ्लेक्सवर कारवाईचा इशारा फोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 06:12 AM2017-12-17T06:12:33+5:302017-12-17T06:12:37+5:30
अनधिकृत जाहिरातफलक कोठेही, कशाही पद्धतीने लावले जात असल्याने शहराचे विद्रूपीकरण होते. कधी न्यायालयाचे निर्देश म्हणून, तर कधी दिखाऊपणासाठी महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन पथक अनधिकृत फलकांवर कारवाई करते.
पिंपरी : अनधिकृत जाहिरातफलक कोठेही, कशाही पद्धतीने लावले जात असल्याने शहराचे विद्रूपीकरण होते. कधी न्यायालयाचे निर्देश म्हणून, तर कधी दिखाऊपणासाठी महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन पथक अनधिकृत फलकांवर कारवाई करते.
मात्र, गेल्या काही महिन्यांत अशा अनधिकृत फलकावर कारवाई होतच नाही. सात दिवसांपूर्वी स्थायी समिती सभेत महापालिका प्रशासनाला धारेवर धरून दोन दिवसांत अनधिकृत जाहिरातफलकांवर कारवाईची धडक मोहीम राबवावी, अशा सूचना देण्यात आल्या. कारवाई मात्र अद्यापही होऊ शकली नाही. कसली कारवाई, कोण घाबरणार ? अशा आविर्भावात काळेवाडीसह शहरातील विविध भागात अनधिकृत फ्लेक्सचे प्रदर्शन भरविण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.
अनधिकृत जाहिरातफलकांवर महापालिकेने कारवाई करावी, शहराचे विद्रूपीकरण रोखावे, अशी मागणी वेळोवेळी स्थायी समितीकडून केली जात असताना, प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. निदान निश्चित असे धोरण ठरवा, अशी मागणी करीत गुरुवारी झालेल्या सभेत सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले होते.
सदस्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारपासून अनधिकृत फ्लेक्सविरुद्ध कारवाईची मोहीम राबविण्याचे आश्वासन दिले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. त्याचप्रमाणे कारवाईसाठी अनधिकृत फ्लेक्सची दखल न घेणाºया क्षेत्रीय अधिकारी आणि बीट निरीक्षकांवर प्रशासन कारवाई करेल.
नगरसेवक, पदाधिकाºयांनी अनधिकृत जाहिरातफलक लावले, तर लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्यावर कारवाई करणार अशी भूमिका व्यक्त करण्यात आली होती.
फ्लेक्सबाजीची स्पर्धा
कारवाईची ठोस भूमिका घेतल्यानंतरही शहरातील अनधिकृत फलक लावणाºयांवर काडीचाही फरक पडला नाही. काळेवाडीत वाकडकडे जाणाºया मार्गावर एकाच ठिकाणी मोठ्या आकारातील ५० हून अधिक अनधिकृत फलक लावले आहेत. या मार्गावरून ये-जा करणाºया व्यक्ती एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने लावलेले अनधिकृत जाहिरातफलक पाहून आश्चर्यचकित होत आहेत. जणूकाही जाहिरात फलकांची स्पर्धा लागली असावी, की प्रदर्शन असाच प्रश्न नागरिकांना पडत आहे.
चुकीचे काम झाकण्यासाठी...
एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने जाहिरातफलक लावण्यामागील गुपित काय असावे, अशी शंका नागरिकांच्या मनात येते. या मार्गावर अनेक ठिकाणी फलक लावण्यासाठी जागा उपलब्ध आहे. एकाच ठिकाणी फलक लावले हा अगदी दर्शनी भाग आहे, असेही नाही. त्या ठिकाणी थोड्या अंतरावर कोठेही फलक लावणे शक्य असताना अशा पद्धतीने फलक लावले आहेत, व्यवस्थित पाहिले, तर लक्षात येते की फलकांच्या मागे राजरोसपणे वाढीव बांधकाम सुरू आहे. चुकीचे एक काम झाकण्यासाठी दुसरे चुकीचे काम केले जात असल्याचे बीट निरीक्षक आणि महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला दिसून येत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.