टोलमधून सूट दिलेल्या वाहनांचे काय ?
By admin | Published: October 5, 2015 01:27 AM2015-10-05T01:27:10+5:302015-10-05T03:36:09+5:30
पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील टोलवसुलीतून करारानुसार अपेक्षेपेक्षा अधिक
पुणे : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील टोलवसुलीतून करारानुसार अपेक्षेपेक्षा अधिक वसुली झाल्याचे स्पष्ट झाल्याने रस्ते विकास महामंडळाने या महामार्गावरून ज्या वाहनांना टोलमधून सूट दिली आहे, अशा वाहनांचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी पुढे आली आहे़
एक्सप्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील टोलवसुलीचे कंत्राट २००४ मध्ये आयआरबी कंपनीला देण्यात आले़ त्यावेळी या महामार्गावरील वाहनांची संख्या अतिशय कमी दाखविण्यात आल्याने त्यावर करण्यात येणारा खर्च वसुलीसाठी १५ वर्षे टोलवसुलीचे हक्क देण्यात आले़ पण, नंतर वाहनांची संख्या वाढल्याने अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक टोलवसुली आतापर्यंत झाली आहे़ त्यामुळे निर्धारित वर्षांपेक्षा अगोदरच कंपनीचा सर्व खर्च वसुली होणार असल्याचे स्पष्ट झाले़
माहिती आयुक्तांनी दिलेल्या दणक्यानंतर आता रस्ते विकास महामंडळाने एक्सप्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या आणि वसूल झालेला टोल याचीच माहिती दिली आहे़
याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी सांगितले, की रस्ते विकास महामंडळाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली माहिती ही अपूर्ण आहे़ त्यांनी केवळ टोल भरलेल्या वाहनांचीच माहिती दिली आहे़ टोलमधून सूट दिली आहे, अशा वाहनांचा तपशील द्यावा़ या वाहनांचे प्रकार व त्यांचे क्रमांकही उपलब्ध उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे़ याबरोबरच महामार्गावर टोल भरणाऱ्या वाहनांना योग्य ती सेवा मिळत आहे का? त्यांची काय तक्रार आहे?़ या तक्रारींचे निवारण करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे़
आयआरबी कंपनी आणि रस्ते विकास महामंडळाने केलेल्या करारामध्ये अनेक अटी कंत्राटदार कंपनीवर घालण्यात आल्या आहेत़ त्यात वाहनांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या कडेला कुंपण घालणे, संरक्षक कठडे उभारणे तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूला १ लाख झाडे लावणे, अशा अनेक अटी आहेत़ या अटींचे पालन झाले आहे का?़ याची तपासणी करण्यासाठी एमएसआरडीने तातडीने एक कमिटी स्थापन करून त्याचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी विवेक वेलणकर यांनी केली आहे़ (प्रतिनिधी)