काय सांगता? पिंपरी-चिंचवडकरांनी 'या'दिवशी मोडले नाहीत प्रशासनाचे नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 08:25 PM2020-09-15T20:25:53+5:302020-09-15T20:26:21+5:30
पोलिसांनी एकही खटला दाखल केला नाही...
पिंपरी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीसह काही निर्बंध लागू आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाचे नियम मोडणाºया नागरिकांवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १९ मार्च २०२० पासून कारवाई होत आहे. भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये कारवाई होते. मात्र सोमवारी (दि. १४) एकाही नागरिकाने नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे पोलिसांकडून देण्यात येणाºया आकडेवारीवरून दिसून येते.
लॉकडाऊन शिथील झाला असला तरी कोरोना महामारी रोखण्यासाठी साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू आहे. त्यानुसार जमावबंदी आहे. मात्र काही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करून विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. तसेच मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सुरक्षा साधनांचा वापर न करणे व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन काही नागरिकांकडून केले जाते. अशा नागरिकांवर पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
पिंपरी शहरातील कारवाईबाबत दररोज आकडेवारी देण्यात येते. त्यानुसार, सोमवारी (दि. १४) शहरातील एकाही नागरिकावर प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सोमवारी सर्व नागरिकांनी नियमांचे पालन केले असून एकाही नागरिकाने नियम मोडले नसल्याचे दिसून येते.
नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित नागरिकावर भादवि कलम १८८ अन्वये खटला दाखल केला जातो. त्यात त्याला कारावास अथवा आर्थिक दंड केला जात आहे. नियमभंग केल्याप्रकरणी दररोज शेकडो नागरिकांवर पोलिसांकडून अशी कारवाई केली जात आहे.
एकही गुन्ह्याची झाली नव्हती नोंद
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. जनता कर्फ्यू असल्याने गुन्हेगार तसेच नागरिकही घरातच होते. त्यामुळे २२ मार्च रोजी शहरात एकही गुन्हा झाल्याची नोंद नाही. त्यापाठोपाठ लॉकडाऊन काळात २ मे रोजी त्याचीच पुनरावृत्ती झाली. त्यामुळे २ मे रोजी देखील एकही गुन्हा नोंद झाला नाही. त्यानंतर लॉकडाऊन काळात १४ सप्टेंबर हा तिसरा असा दिवस आहे, ज्या दिवशी नागरिकांनी नियमभंग केल्याची नोंद नाही. त्यामुळे नागरिकांवर सोमवारी (दि. १४) नियमभंगप्रकरणी एकही कारवाई झाली नाही.