काय म्हणावं...! पोलीस अधिकाऱ्यानेच पळविले तक्रारदार तरुणीचं ब्रॅण्डेड कंपनीचं घड्याळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 09:49 PM2021-04-30T21:49:26+5:302021-04-30T21:52:39+5:30
भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी २५ वर्षीय संबंधित तरुणी २४ एप्रिल रोजी रात्री उशिरा हिंजवडी पोलिस ठाण्यात गेली होती.....
पिंपरी : तक्रारदार तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि चहा पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून महागडे घड्याळ चोरी केल्या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यातील फौजदाराला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी (दि ३०) त्या बाबतचे आदेश दिले.
प्रशांत राजेंद्र रेळेकर असे निलंबित फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी संबंधित तरुणी २४ एप्रिल रोजी रात्री उशिरा हिंजवडी पोलिस ठाण्यात गेली होती. तक्रार घेतल्यानंतर रेळेकर तरुणीला सोडण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला. दरम्यान, त्याने गाडीमध्ये तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. आपण कधीही हॉटेलवर जाऊ शकतो. मी तुमच्यासाठी कोणतेही हॉटेल उघडायला सांगेन. मी उद्या मिरजेला चाललो आहे. तू पण माझ्या सोबत चल, असे म्हणाला. त्यावेळी घाबरलेल्या तरुणीने रेळेकरला नकार दिला.
गाडी तरुणीच्या घराजवळ पोहचल्या नंतर रेळेकर याने कंटाळा आल्याचे सांगत चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली. तरुणीने नाईलाजास्तव रेळेकरला चहा पिण्यासाठी घरात घेतले. त्यावेळी तरुणीची आई देखील घरात होती. चहा पिताना रेळेकरने चार्जिंगला लावलेले अँपल कंपनीचे घड्याळ खिशात घातले. तरुणीने दुसऱ्या दिवशी ठाण्यात धाव घेत वरिष्ठांना घडलेला प्रकार सांगितला. वरिष्ठांनी झाडाझडती घेतल्यानंतर रेळेकर याने तरुणीचे घड्याळ परत दिले. रेळेकरमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत कृष्ण प्रकाश यांनी त्यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले. या बाबत हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.
-----
कोणताही अधिकारी सामान्य नागरिकांना त्रास देत असेल, त्यांच्याशी गैर वर्तणूक करीत असल्यास त्यांची गय केली जाणार नाही. माझ्याकडे चुकीला माफी नाही. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे.
कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी- चिंचवड