"प्रेमासाठी वाट्टेल ते.."; 'सैराट' मुले-मुली सज्ञान होण्यापूर्वीच ओलांडतात घराचा उंबरठा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 02:59 PM2021-03-08T14:59:55+5:302021-03-08T15:02:18+5:30
गेल्यावर्षी अल्पवयीन मुले व मुलींच्या अपहरणाचे तसेच हरविल्याचे, बेपत्ता झाल्याचे ३०६ गुन्हे दाखल झाले होते...
नारायण बडगुजर-
पिंपरी : प्रेमासाठी वाट्टेल ते, असे म्हणत काही मुली सज्ञान होण्यापूर्वीच घराचा उंबरठा ओलांडतात. असे ‘सैराट’ असलेले अल्पवयीन मुली व मुले प्रियकर व प्रेयसीसोबत घरातून पळून जात आहेत. कोरोना शिथील होताच त्यात वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी अल्पवयीन मुले व मुलींच्या अपहरणाचे तसेच हरविल्याचे, बेपत्ता झाल्याचे ३०६ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील ३६ मुले तर १२६ मुली अद्याप मिळून आलेल्या नाहीत.
पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून सैराट झालेल्या मुलामुलींची संख्या वाढत आहे. शहर परिसरातूल २०१५ ते २०२० या सहा वर्षांत अल्पवयीन मुली व मुलांच्या अपहरण, हरविल्याचे तसेच बेपत्ता झाल्याच्या २३९२ घटना घडल्या. यात ७९२ मुले तर मुली १६२१ आहेत. तसेच २०१९ मध्ये सर्वाधिक ५१० गुन्हे आहेत. पोलिसांनी तपास करून यातील काही मुली व मुलांना शोधून त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. मात्र काही मुली व मुले अद्याप बेपत्ता आहेत. काहींनी सज्ञान झाल्यानंतर संसार थाटल्याचे समोर आले आहे. मात्र घरच्यांचा विरोध असल्याचे लक्षात येताच अशा अल्पवयीनांकडून धूम ठोकली जात आहे. असे सैराट प्रेमीयुगल विवाहबंधनात अडकल्यानंतरही नातेवाईक तसेच कुटुंबियांच्या संपर्कात येत नाहीत.
अपहरण झालेल्या मुली व मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या आवडीनिवडी, मित्र, त्यांच्या सवयी याबाबत सतर्क राहिले पाहिजे. आवश्यकता असल्यास त्यांचे समुपदेशन केले पाहिजे. पोलिसांची मदत घ्यावी.
- प्रेरणा कट्टे, सहायक पोलीस आयुक्त
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात दाखल अपहरण, बेपत्ता झालेले व हरवलेले अल्पवयीन
दाखल गुन्हे - हरवलेले मुले -मुली - मिळून न आलेले मुले -मुली
२०१५ - ३११- ९८ - २१३- १- ५
२०१६ - ३७५ - १५३ - २२२ - ५ - १६
२०१७ - ४५० - १३७ - ३१३ - ५- १९
२०१८ - ४४० - १४२ - २९८ - ८ - ३६
२०१९ - ५१० - १७४ - ३४३ - २३ - ६४
२०२० - ३०६ - ८८ - २३२ - ३६ - १२६
२०२० मध्ये हरविलेली मुले - मुली
जानेवारी - १९ - २२
फेब्रुवारी - १६ - ३६
मार्च - ८ - १७
एप्रिल - ५ - ६
मे - ३ - ६
जून - ४ - १०
जुलै - १ - १५
ऑगस्ट - १ - १९
सप्टेंबर - ११ - २६
ऑक्टोबर - ७ - ३३
नोव्हेंबर - १२ - १३
डिसेंबर - ७ - २८