स्वयंचलित जिन्याचे उद्घाटन कधी? पिंपरी रेल्वे स्थानकावर एकच सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 01:35 AM2019-02-18T01:35:30+5:302019-02-18T01:35:54+5:30
पिंपरी रेल्वेस्थानक : काम पूर्ण होऊनही प्रवाशांची होतेय गैैरसोय; प्रशासनाचे दुर्लक्ष
पिंपरी : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी पिंपरी रेल्वे स्थानकावर स्वयंचलित जिना उभारण्यात आला आहे. या जिन्याचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र, हा जिना प्रवाशांसाठी अद्यापही खुला करण्यात आलेला नाही. या जिन्याच्या उद्घाटनाला कधी मुहूर्त लागणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पुणे ते लोणावळा या मार्गावरील पिंपरी रेल्वे स्थानक महत्त्वाचे मानले जाते. या मार्गावर उपनगरीय रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दररोज हजारो प्रवासी या मार्गाने प्रवास करतात. दरम्यान, या मार्गावरील कपडे, इलेक्ट्रॉनिक्सवस्तू, किराणा माल याची मुख्य बाजारपेठ, मंडई यांसह शासकीय कार्यालये, न्यायालय, मोठी रुग्णालये, नामांकित महाविद्यालये पिंपरीत असल्याने रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिक असते. दरम्यान, सध्या लोहमार्ग ओलांडण्यासाठी रेल्वे स्थानकावर दोन जिने आहेत. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ते जिनेदेखील अपुरे पडतात. तसेच अपंग, वृद्ध प्रवाशांना जिन्यावरून चढ-उतार करणे शक्य होत नाही. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा व्यक्तींना अनेकदा उचलून न्यावे लागते.
ही गैरसोय टाळण्यासाठी सुमारे चार महिन्यांपूर्वी स्वयंचलित जिने उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, स्वयंचलित जिना सुरू झाल्यास या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, या जिन्याचे उद्घाटन होणार कधी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जनसंपर्क अधिकारी : तांत्रिक कामे सुरू
शिवाजीनगर ते लोणावळा या रेल्वे मार्गावरील पिंपरी स्थानकावरील हे पहिलेच स्वयंचलित जिना ठरणार आहे. पुण्याहून लोणावळ्याकडे, तसेच लोणावळ्याहून पुण्याकडे जाणाºया अशा दोन्ही मार्गांच्या बाजूला तिकीट खिडकीलगत असलेल्या जिन्यांना समांतर हे स्वयंचलित जिने आहेत. या जिन्यांचे काम पूर्णत्वास आले असून, काही दिवसांतच प्रवाशांसाठी हे जिने खुले केले जाणार आहेत.
दोन्ही बाजूंनी स्वयंचलित जिना उभारण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. मात्र, काही छोटी तांत्रिक कामे अद्याप बाकी आहेत. लवकरात लवकर सर्व कामे पूर्ण केली जातील. तसेच या आठवड्याच्या अखेरपर्यंत हा स्वयंचलित जिना प्रवाशांसाठी खुला होईल.
- मनोज झंवर, रेल्वे जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग