डीपी रस्त्याचा विकास कधी?
By Admin | Published: October 15, 2015 12:38 AM2015-10-15T00:38:10+5:302015-10-15T00:38:10+5:30
पिंपळे सौदागर परिसरातील काही डीपी रस्ते विकसित झाले नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शिवप्रसाद डांगे, रहाटणी
पिंपळे सौदागर परिसरातील काही डीपी रस्ते विकसित झाले नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर काही रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे.
कोकणे चौक ते शिवराजनगरदरम्यान छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर बारा मीटर रुंद डीपी रस्त्याचे आरक्षण आहे. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता विकसित करण्यात आला आहे. मात्र, त्यापुढील रस्ता मागील अनेक दिवसांपासून ‘जैसे -थे’ आहे. पालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाकडे यातील काही भूखंडाचा ताबाही दिला आहे, तरी पालिका ठोस भूमिका घेत नाही. या परिसरातील दिवसेंदिवस नागरी वस्ती वाढत आहे. तसेच गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. मात्र, रस्ताच नसल्याने व आहे तो रस्ता योग्य नसल्याने नागरिकांना जा-ये करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या या ठिकाणी नियोजित रस्त्यापैकी निम्मा रस्ता आहे. मात्र, तोही योग्य नाही. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे आहेत. अनेक नागरिकांनी रस्त्यावर झाडे लावली आहेत. या रस्त्यावर अनेक खड्डे पडल्याने खड्ड्यात रस्ता, की रस्त्यात खड्डे, अशी भयावह परिस्थिती आहे. या सर्व प्रकाराकडे पालिका प्रशासन निव्वळ डोळेझाक करीत आहे. खरे तर रहाटणी परिसर पालिका हद्दीत आहे की नाही, असाच प्रश्न काही वेळा पडल्याशिवाय राहत नाही. नियोजित डीपी रस्ते, उद्यान अनेक चांगल्या सामाजिक प्रकल्पासाठी पालिका प्रशासनाने आरक्षण टाकले. मात्र, ते विकसित करण्यासाठी सध्याचे अधिकारी, कर्मचारी मागे-पुढे पाहत आहेत. लाखो रुपये मिळकत कर पालिकेला येथील नागरिकांकडून भराला जात असूनसुद्धा पालिका प्रशासन सामान्य गरजासुद्धा भागवू शकत नाही. त्यामुळे येथील रहिवाशी, वाहनचालक वैतागले आहेत.