चर्चा तर होणार ना भाऊ.. जेव्हा मुख्यमंत्र्याच्या सौभाग्यवती बैलगाडी चालवितात.....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 01:13 PM2019-02-12T13:13:56+5:302019-02-12T13:14:35+5:30
फुलांनी सजवलेल्या, शिंगाना गुलाबी रंगांचे गोंडे बांधलेल्या, ऐटदार खिल्लारी जोडी असलेल्या बैलगाडा चालविण्याचा आनंद लुटला.
पिंपरी : आपण त्यांना याअगोदर गाणे गाताना पाहिले, कधी त्यांची क्रुझवरील सेल्फीची क्लिक अनुभवली.. तर कधी त्यांच्या सामाजिक कामाचे दर्शनही झाले असेल पण त्यांना फुलांनी सजवलेल्या, शिंगाना गुलाबी रंगांचे गोंडे बांधलेल्या, ऐटदार खिल्लारी बैलांची जोडी असलेल्या बैलगाडी चालविताना पाहणे हा दुर्मिळ योगा योगच... खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनी जेव्हा बैलगाडा चालविण्यास सुरुवात केली तेव्हा उपस्थितांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या...
भोसरीमधील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर शिवांजली महिला बचत गटाच्या वतीने भोसरीतील गायजत्रा मैदानावर इंद्रायणी थडी जत्रेस फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी संयोजक आमदार महेश लांडगे, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, पूजा लांडगे आदी उपस्थित होते. फुलांनी सजवलेल्या, शिंगाना गुलाबी रंगांचे गोंडे बांधलेल्या, ऐटदार खिल्लारी जोडी असलेल्या बैलगाडीतून, ढोल ताशांच्या गजरात अमृता फडणवीस यांना कार्यक्रम स्थळी आणण्यात आले. त्यांनी बैलगाडा चालविण्याचा आनंद लुटला. केशरी रंगाचा हिरवा तुरा असलेला फेटा फडणवीस यांना बांधला होता.ग्रामीण संस्कृतीचा अनुभव त्यांनी घेतला.यावेळी खडकी येथील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरच्या बास्केटबॉलच्या राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंचा ५१००० रुपयांचा धनादेश देऊन खास सत्कार करण्यात आला. तसेच किल्ले चढण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल गिरीजा धनाजी लांडगे हिचा अमृता फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
फडणवीस म्हणाल्या, आपल्या महिला बचतगटांमधील स्त्रिया प्रामाणिकपणे जे काम करतात त्याला तोड नाही. त्यात त्यांची जिद्द दिसून येते. नाहीतर आजकाल मोठ्या मोठ्या कंपन्यादेखील बँकांकडून कर्ज घेऊन ती बुडवतात. पण महिला बचतगटांतील महिला त्यांच्या कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करतात. आपल्या आर्थिक बाबींमध्ये स्त्रियांचा जास्त हातभार असेल तर देश पुन्हा एकदा नक्कीच सोने की चिडीया बनू शकेल. फडणवीस म्हणाल्या, जत्रेमुळे महिलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळणार आहे. आपण आता मोठा विचार करायला हवा. चांगले कौशल्य आत्मसात केले तर त्याला नक्कीच चांगली बाजारपेठ मिळेल. तुमच्या मनात प्रबळ इच्छा असेल तर यशाचे शिखर नक्की गाठता येईल. स्त्री ही अबला नसून सबला आहे. हिरकणीसारखी साधी स्त्री आपल्या बाळासाठी कोणत्याही अग्निदिव्याला सामोरी गेली. स्त्रिया प्रत्येक संकटाला धैयार्ने तोंड देतात.
प्रास्तविक सोनाली गव्हाणे यांनी केले. आभार आमदार महेश लांडगे यांनी मानले. सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले.